निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा ७,८ ऑक्टोबर रोजी गोवा दौरा

निवडणूक सज्जतेचा घेणार आढावा; भारतीय निवडणूक आयोगाचे उच्चस्तरीय पथक ७ आणि ८ ऑक्टोबर २०२६ रोजी गोव्याला भेट देणार आहे. वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त मनीष गर्ग आणि पवन कुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हे पथक गोव्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक सज्जतेचा आढावा घेणार आहे. हे पथक ७ रोजी गोव्यातील मुख्य निवडणूक अधिकारी, राज्य पोलीस नोडल अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलीस अधीक्षक आणि अंमलबजावणी यंत्रणांसोबत विशेष बैठका घेणार आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
36 mins ago
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा ७,८ ऑक्टोबर रोजी गोवा दौरा

पणजी : भारतीय निवडणूक आयोगाचे उच्चस्तरीय पथक ७ आणि ८ ऑक्टोबर २०२६ रोजी गोव्याला भेट देणार आहे. वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त मनीष गर्ग आणि पवन कुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हे पथक गोव्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक सज्जतेचा आढावा घेणार आहे. हे पथक ७ रोजी गोव्यातील मुख्य निवडणूक अधिकारी, राज्य पोलीस नोडल अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलीस अधीक्षक आणि अंमलबजावणी यंत्रणांसोबत विशेष बैठका घेणार आहे.

या पथकात आशिष गोयल, शुब्रा सक्सेना, बिद्याराणी कोन्थौजम, प्रधान सचिव अजय कुमार, सचिव विनोद कुमार आणि अवर सचिव एम एल मीना यांचाही समावेश असेल. ८ ऑक्टोबर रोजी तिन्ही जिल्ह्यांतील निवडणूक अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याद्वारे स्वतंत्र सादरीकरण केले जाईल. यानंतर वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त मनीष गर्ग आणि पवन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाने या सत्राची सांगता होणार आहे.

या भेटीच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी त्रिवेणी वेळीप यांनी तिन्ही जिल्ह्यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश जारी केले आहेत.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने इआरओ, एइआरओ आणि बीएलओ अशा निवडणूक अधिकाऱ्यांना महाविद्यालये, विद्यापीठे आणि इतर शैक्षणिक संस्थांमधील तरुण व नवमतदारांना लक्ष्य करून संस्थात्मक स्तरावर सक्रिय मतदार नोंदणी मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणूक साक्षरता क्लब्सना (ईएलसी) स्थानिक पातळीवर जनजागृती करण्याचे आणि विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास मदत करण्याचे काम सोपवण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाच्या आगामी भेटीदरम्यान त्यांना देण्यात येणाऱ्या सादरीकरणासाठी वरील अधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या जनजागृती मोहिमा, भेट दिलेल्या संस्थांची माहिती, तसेच प्राप्त झालेले अर्ज आदींच्या बाबत सविस्तर तपशील असलेला कारवाई अहवाल तयार ठेवण्याच्या सूचना त्रिवेणी वेळीप यांनी दिल्या आहेत. 

हेही वाचा
सर्व पहा