पणजी : आम आदमी पार्टीचे (आप) माजी राज्य सरचिटणीस फ्रान्सिस कुएल्हो यांनी 'आप'ला अधिकृतपणे सोडचिठ्ठी देत आपल्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आणि समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे गोव्यात काँग्रेसची संघटन रचना आणि राजकीय ताकद अधिक भक्कम झाल्याचे मानले जात आहे. पणजी येथे आयोजित विशेष पक्षप्रवेश सोहळ्यात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सर्व नवीन सदस्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
पत्रकारांशी बोलताना फ्रान्सिस कुएल्हो यांनी 'आप'ला सोडण्यामागची मुख्य कारणे स्पष्ट केली. आम आदमी पार्टीचे दिल्लीतील केंद्रीय नेतृत्व स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेते आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा योग्य आदर करत नाही, असा थेट आरोप त्यांनी केला. या असंतोषामुळेच आपण 'आप' सोडण्याचा निर्णय घेतला असून, गोव्यात भाजप सरकारला सत्तेवरून हटवण्यासाठी काँग्रेस हाच एकमेव सक्षम राजकीय पर्याय असल्याचे सांगत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस नेत्यांनी या प्रवेशाचे स्वागत करत, अभ्यासू संघटकांच्या आगमनाने पक्षाला नवी ऊर्जा मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
दुसरीकडे, काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी काँग्रेसवर होणाऱ्या विरोधी पक्षांच्या टीकेवर तीव्र आक्षेप घेतला. काँग्रेसच्या वतीने गोव्यात काढण्यात येत असलेल्या जनसंपर्क यात्रेला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असताना, भाजपसह इतर विरोधी पक्ष काँग्रेसलाच लक्ष्य का करत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मूळ लढा सत्ताधारी भाजपविरोधात असताना इतर विरोधी पक्षांच्या या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून, त्यांचा अजेंडा भाजपला सत्तेवरून हटवणे आहे की काँग्रेसवर हल्ला करणे, अशी शंका निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.


