कागदपत्रे दाखवून काम होत नाही; संबंधित खात्यांकडे पाठपुरावा देखील करावा लागतो : दामू नाईक

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी फातोर्डा मतदारसंघातील रखडलेल्या विकासावरून सरदेसाई यांच्यावरच थेट सवाल उपस्थित केले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
11 mins ago
कागदपत्रे दाखवून काम होत नाही; संबंधित खात्यांकडे पाठपुरावा देखील करावा लागतो : दामू नाईक

पणजी : गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय आणि प्रशासकीय कारभारावरून सरकारवर केलेल्या टीकेला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. कोणताही प्रकल्प अथवा योजना सरकार मंजूर करते हे मान्य, पण सरकारी पातळीवर प्रत्यक्ष पाठपुरावा करणे ही स्थानिक आमदारांची जबाबदारी असते, असे दामू म्हणाले. 

पत्राकरांशी बोलताना दामू नाईक यांनी आमदार विजय सरदेसाई यांच्यावर थेट निशाणा साधत फातोर्डा मतदारसंघातील स्थानिक प्रश्नांवर उत्तर देण्याचे आव्हान दिले. गेल्या अनेक वर्षांपासून फातोर्डा बस स्थानकाचे काम का प्रलंबित राहिले आहे, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मतदारसंघातील ३०० एफएसआय (FSI), टोलेजंग इमारती आणि बांधकाम परवानग्यांवरून सरदेसाई यांना घेरले. लोकप्रतिनिधीचे मुख्य काम केवळ कागदपत्रे दाखवणे नसून, मंत्रालयात फाईल्सचा पाठपुरावा करून मुख्यमंत्र्यांकडून आणि संबंधित मंत्र्यांकडून विकासकामे मंजूर करून घेणे हे असते, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा रुग्णालयातील सोयी-सुविधा आणि खाटांच्या तुटवड्याबाबत स्पष्टीकरण देताना नाईक म्हणाले की, जसजशी लोकसंख्या वाढते तसा वैद्यकीय सेवांवर आणि रुग्णालयांवर नैसर्गिक ताण येतो. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाबाबत सरकार पूर्णपणे सक्षम असून टप्प्याटप्प्याने सर्व आवश्यक सुविधा पुरवल्या जात आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार अत्यंत सक्षमपणे काम करत असून जनतेच्या हिताच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवत आहे. विरोधक केवळ निवडणुकीच्या तोंडावर आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी टीका करत आहेत, परंतु प्रत्यक्षात कोण काम करत आहे हे जनता ओळखून आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा
सर्व पहा