'मन की बात'च्या १३८ व्या भागातून पंतप्रधान मोदींकडून सर्जिकल स्ट्राइकच्या आठवणींना उजाळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'च्या १३८ व्या भागातून सर्जिकल स्ट्राइकच्या आठवणींना उजाळा देत डिजिटल जनगणना, स्वच्छता मोहीम आणि 'नशा मुक्त युवा' अभियानाचा सविस्तर आढावा घेतला.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
'मन की बात'च्या १३८ व्या भागातून पंतप्रधान मोदींकडून सर्जिकल स्ट्राइकच्या आठवणींना उजाळा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या 'मन की बात' या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या १३८ व्या भागातून देशवासीयांशी संवाद साधला. या प्रसंगी त्यांनी २०१६ मध्ये भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेपार केलेल्या ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राइकच्या आठवणींना उजाळा दिला. या कारवाईच्या दहाव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत भारताने आता दहशवादाविरुद्ध 'झिरो टॉलरन्स'ची स्पष्ट नीती स्वीकारली असून, देश कोणत्याही आक्रमकतेला चोख व निर्णायक उत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

आपल्या संबोधनात पंतप्रधानांनी देशात सुरू असलेल्या डिजिटल जनगणनेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. आतापर्यंत ३२ कोटींहून अधिक कुटुंबांची नोंदणी पूर्ण झाली असून, दुर्गम आणि बर्फाच्छादित भागांत हे काम वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी ऑनलाइन पोर्टलचा वापर करून या प्रक्रियेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष स्वर्गीय अशोक सिंघल यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहताना, सामाजिक समरसतेतील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.

 सोमनाथ स्वाभिमान पर्व आणि मोढेरा येथील सूर्य मंदिराच्या पुनरुत्थानाचा संदर्भ देत त्यांनी भारताच्या सांस्कृतिक व अक्षय ऊर्जेच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकला. परकीय आक्रमणांनंतरही मोढेराने पुन्हा उभारी घेत आज देशातील पहिले संपूर्ण सौर ऊर्जा ग्राम होण्याचा मान मिळवल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी २ ऑक्टोबरच्या गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वच्छता मोहिमेचा पुनरुच्चार केला, तसेच तरुणांना अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या १०० आठवड्यांच्या 'नशा मुक्त युवा' अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.

हेही वाचा
सर्व पहा