कुजिरा येथे अटल स्टेडियमवर ३७ व्या वेस्ट झोन ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचा शुभारंभ

कुजिरा येथे ३७ व्या वेस्ट झोन ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते झाले; पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रात यजमान गोव्याने एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
20 mins ago
कुजिरा येथे अटल स्टेडियमवर ३७ व्या वेस्ट झोन ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचा शुभारंभ

पणजी : गोव्यातील कुजिरा, बांबोळी येथे अटल स्टेडियमवर ३७ व्या वेस्ट झोन ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२६ चे  उद्घाटन करण्यात आले. 'गोवा ॲथलेटिक असोसिएशन' आणि 'ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया' यांच्या संयुक्त विद्यमाने या तीन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे क्रीडा संचालक अजय गावडे, आयोजक समितीचे अध्यक्ष राजसिंग राणी आणि सचिव ॲड. अखिल पार्रीकर यांच्यासह विविध राज्यांतून आलेले खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आपल्या भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला. स्वतः या प्रकारच्या स्पर्धांत भाग घेऊन १०० मीटर व ४०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकल्याचे सांगत त्यांनी तरुण खेळाडूंना प्रोत्साहित केले. ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप ही खेळाडूंसाठी केवळ एक स्पर्धा नसून, स्वतःची क्षमता, आत्मविश्वास आणि नैपुण्य यांचे आत्मपरीक्षण करण्याची एक उत्तम संधी आहे. ॲथलीट्सनी कधीही प्रयत्न न सोडता यश संपादन करावे आणि देशाच्या नावलौकिकात भर घालावी, असे सांगत खेळाडूंनी आशियाई खेळ, राष्ट्रकुल स्पर्धा आणि ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.

क्रीडा संचालक अजय गावडे यांनी, गोव्याच्या क्रीडा धोरणामुळे राज्य आता पर्यटनासोबतच 'स्पोर्ट्स हब' म्हणून नावारूपाला येत असल्याचे नमूद केले. तसेच, ब्राझील येथे होणाऱ्या आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करण्यासाठी 'ऑल इंडिया ट्रायल्स' गोव्यात याच मैदानावर पार पडणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या तीन दिवसीय स्पर्धेत गोवा, महाराष्ट्र, राजस्थान यांसह विविध राज्यांतील बाल व युवा खेळाडू भाग घेतला असून, स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सकाळच्या  यजमान गोव्याच्या खेळाडूंनी एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावून पदकांचे खाते उघडले आहे.

हेही वाचा
सर्व पहा