पणजी :देशांतर्गत पर्यटनात गोमंतकीय नागरिकही आघाडीवर असून, सुट्टी आणि मनोरंजनासाठी ४६.१ टक्के तर देवदर्शनासाठी ४२ टक्के गोमंतकीय राज्याबाहेर प्रवास करतात. एका दिवसाहून अधिक काळ मुक्कामी असणाऱ्या या पर्यटनाची माहिती केंद्रीय सांख्यिकी खात्याच्या ‘भारतातील स्थानिक पर्यटन’ या नव्या अहवालातून समोर आली आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयातर्फे जुलै २०२५ ते जून २०२६ दरम्यान देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत हे सर्वेक्षण करण्यात आले. यात गोव्यातील १६० ग्रामीण आणि २४० शहरी कुटुंबांसह देशभरातील २.४५ लाखांहून अधिक कुटुंबांचा सहभाग होता.
मुक्कामी पर्यटनाची कारणनिहाय आकडेवारी
आरोग्य, शिक्षणासाठी प्रवास
या सर्वेक्षणानुसार, गोव्यातून ७.५ टक्के व्यक्ती आरोग्य आणि शिक्षण या कारणांसाठी अन्य राज्यांत पर्यटनास जातात. तसेच, पर्यटनासाठी जाणाऱ्या एकूण गोमंतकीयांपैकी १.२ टक्के लोक खरेदीसाठी आणि ३.२ टक्के जण अन्य विविध कारणांसाठी राज्याबाहेर प्रवास करतात.
एका दिवसाच्या आत (२४ तासांपेक्षा कमी) केल्या जाणाऱ्या पर्यटन सहलींचा विचार केल्यास, ४१ टक्के गोमंतकीय प्रामुख्याने देवदर्शनासाठी अन्य राज्यांत जातात. त्याखालोखाल ३६.४ टक्के जण सुट्टीसाठी, १.५ टक्के लोक खरेदीसाठी आणि १.२ टक्के लोक शिक्षण व आरोग्यासाठी राज्यांतर्गत आणि राज्याबाहेर पर्यटन करतात.
देशाचा विचार केल्यास ४७ टक्के लोक देवदर्शनासाठी, २९.९६ टक्के आरोग्य व शिक्षणासाठी आणि २२.१० टक्के लोक विश्रांतीसाठी एक दिवसीय सहली काढतात.
एक दिवसीय सहली : गोवा विरुद्ध देश
याच अहवालानुसार, जुलै २०२५ ते जून २०२६ या काळात गोव्यात आलेल्या एकूण पर्यटकांपैकी ९३ टक्के पर्यटक हे विश्रांती, मनोरंजन अथवा सुट्टीसाठी आले होते. तर धार्मिक कारणांसाठी ५ टक्के, आरोग्यविषयक कारणांसाठी ०.८ टक्के आणि अन्य विविध कारणांसाठी १.२ टक्के पर्यटकांनी गोव्याला भेट दिली आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
गोव्याच्या पर्यटनाचे वेगळे चित्र
अहवालातील आकडेवारीवरून गोमंतकीयांच्या राज्याबाहेरील मुक्कामी पर्यटनात सुट्टी-मनोरंजन आणि देवदर्शन ही दोन प्रमुख कारणे असल्याचे दिसून येते. दुसरीकडे, गोव्यात येणाऱ्या पर्यटकांमध्ये विश्रांती, मनोरंजन आणि सुट्टी हा प्रमुख पर्यटन हेतू असल्याचे आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.


