‘स्टेमी’मुळे हृदयविकाराच्या मृत्यूचे प्रमाण घटले

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
26th September, 11:41 pm
‘स्टेमी’मुळे हृदयविकाराच्या मृत्यूचे प्रमाण घटले

पणजी : हृदयविकाराच्या झटक्यामुळे पहिल्या टप्प्यात होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य खात्याने सुरू केलेल्या ‘स्टेमी’ उपक्रमाचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ४.४ लाख ईसीजी तपासण्या करण्यात आल्या असून, त्यामध्ये ११ हजार जणांना गंभीर आजार असल्याचे निदान झाले आहे. स्टेमीमुळे हृदयविकाराच्या झटक्याने होणारे सुरुवातीच्या टप्प्यातील मृत्यूचे प्रमाण ७.२ टक्क्यांवरून २.४ टक्क्यांवर आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.
राज्य सरकार आणि ट्रायकोग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग (सीव्हीडी) शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी राणे बोलत होते. देशभरातील धोरणकर्ते, सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ आणि चिकित्सक या संमेलनात सहभागी झाले आहेत.
गोव्याचा स्टेमी कार्यक्रम तंत्रज्ञान, लवकर निदान आणि एकसंध आरोग्यसेवा नेटवर्कच्या माध्यमातून जीव वाचविण्याचे प्रभावी उदाहरण आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्यातील २० ठिकाणी चाचणी सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. प्रत्येक गोवेकराला वेळेवर निदान, जलद उपचार आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यावर गोवा आरोग्यसेवा सातत्याने लक्ष केंद्रित करत आहे, असे मंत्री राणे यांनी सांगितले.
‘एसटी एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फार्क्शन’ (स्टेमी) हा हृदयाच्या एका भागातील रक्तप्रवाहात अडथळा निर्माण झाल्यामुळे होणारा गंभीर हृदयविकाराचा झटका आहे. या प्रकल्पात ‘हब अँड स्पोक’ मॉडेलचा वापर करण्यात आला आहे. कॅथ लॅबची सुविधा असलेले टर्शरी रुग्णालय ‘हब’, तर रुग्णाला स्थिर करण्यासाठी निश्चित केलेल्या सार्वजनिक आरोग्य सुविधा ‘स्पोक’ म्हणून काम करतात. प्रत्येक स्पोकमध्ये ट्रायकोग ईसीजी मशीन बसवण्यात आले असून, ते टेली-ईसीजी सुविधा आणि कार्डिओनेट अॅपशी जोडलेले आहे. या अॅपच्या माध्यमातून ईसीजीचा डेटा बंगळुरूमधील हृदयरोगतज्ज्ञांच्या पथकाशी जोडला जातो. त्यामुळे ईसीजी अहवाल पाच मिनिटांपेक्षा कमी वेळेत मिळतो.
रुग्णांच्या हस्तांतरणाचे थेट निरीक्षण
या प्रकल्पात कार्डियाक रुग्णवाहिकेचीही सुविधा उपलब्ध आहे. गरज भासल्यास रुग्णाला स्पोकमधून हब रुग्णालयात हलवता येते. रुग्णाच्या हस्तांतरणाचा थेट मागोवाही घेता येतो. या व्यवस्थेमुळे हृदयविकाराच्या रुग्णाला उपचार मिळण्याचा सरासरी वेळ कमी होऊन तो ९० मिनिटांच्या ‘गोल्डन अवर’च्या जवळ आणण्यास मदत होत आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांचे प्राण वाचविण्यात या उपक्रमाची महत्त्वाची भूमिका ठरत असल्याचे सांगण्यात आले.       

हेही वाचा
सर्व पहा