पर्यटन खात्याच्या नकाशावर धारबांदोडा तालुकाच गायब !

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
26th September, 11:37 pm
पर्यटन खात्याच्या नकाशावर धारबांदोडा तालुकाच गायब !

पर्यटन खात्याचा धारबांदोडा तालुका नसलेला नकाशा.‍

फोंडा : जागतिक पर्यटन दिनाच्या पार्श्वभूमीवर गोवा पर्यटन खात्याच्या कारभारातील एक विसंगती समोर आली आहे. पर्यटन विभागाने प्रसारित केलेल्या गोव्याच्या पर्यटक नकाशावर अद्याप धारबांदोडा तालुका दाखवण्यात आलेला नसून, कुळे येथील दूधसागर धबधबा आणि तांबडीसुर्ला येथील ऐतिहासिक महादेव मंदिरासह या तालुक्यातील पर्यटनस्थळे सांगे तालुक्यात दाखवण्यात आल्याचा दावा गोवा कॅन या स्वयंसेवी संस्थेने केला आहे.
धारबांदोडा तालुक्याची निर्मिती १५ वर्षांहून अधिक काळापूर्वी झाली आहे. त्यानंतर तालुक्यात विविध सरकारी कार्यालयेही सुरू करण्यात आली असून, त्याचा लाभ नागरिकांना मिळत आहे. असे असतानाही पर्यटन विभागाच्या नकाशावर तालुक्याचे स्वतंत्र अस्तित्व दाखवण्यात आले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
धारबांदोडा तालुक्याची निर्मिती होऊन अनेक वर्षे उलटली असतानाही पर्यटन खात्याच्या नकाशात त्याचा स्वतंत्र उल्लेख नसल्याने या नकाशाच्या अचूकतेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. दूधसागर धबधबा, तांबडीसुर्ला यांसारखी प्रमुख पर्यटनस्थळे धारबांदोडा तालुक्यात असूनही ती सांगे तालुक्यात दाखवण्यात आल्याने पर्यटक आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित व्यक्तींमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित नकाशाची तातडीने दुरुस्ती करून अद्ययावत माहिती प्रसिद्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, गोवा कॅनने कुशावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. पर्यटन विभागाचा चुकीचा व कालबाह्य छापील पर्यटक नकाशा तत्काळ मागे घेऊन त्याचे वितरण थांबवावे तसेच धारबांदोडा तालुक्यासह अचूक माहिती असलेला नवीन पर्यटक नकाशा निश्चित कालमर्यादेत प्रकाशित करावा, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
चुकीची माहिती मिळण्याची शक्यता
धारबांदोडा तालुक्यातील कुळे येथील दूधसागर धबधबा तसेच तांबडीसुर्ला येथील ऐतिहासिक महादेव मंदिराला दरवर्षी मोठ्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. त्यामुळे पर्यटन नकाशावर तालुक्याची चुकीची माहिती दिल्याने पर्यटकांची दिशाभूल होण्याची शक्यता असल्याचे गोवा कॅनने म्हटले आहे.

संस्थेच्या सदस्यांनी २१ सप्टेंबर रोजी पणजीतील पाटो येथील पर्यटन विभागाच्या कार्यालयाला भेट दिली होती. यावेळी संस्थेला देण्यात आलेल्या छापील नकाशावर धारबांदोडा तालुका दाखवण्यात आलेला नसल्याचे आढळून आले.
- रोलँड मार्टिन्स, संयोजक, गोवा कॅन            

हेही वाचा
सर्व पहा