वास्को : वेर्णा पोलिसांनी सात महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणाचा शनिवारी छडा लावला. कर्नाटकातील हॉस्पेट येथून १६ वर्षीय मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली. तिचे अपहरण केल्याच्या आरोपावरून झुआरीनगर, सांकवाळ येथील २४ वर्षीय मोतीलाल वलिकार याला अटक करण्यात आली आहे.
१७ मार्च रोजी दुपारी २ वाजता झुआरीनगर येथील घरातून मुलगी बेपत्ता झाली होती. मुलीचे अपहरण झाल्याचा संशय आल्याने तिच्या आईने त्याच रात्री वेर्णा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजदत्त आर्सेकर यांनी हाती घेतला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने मुलीला प्रथम महाराष्ट्रात नेले आणि त्यानंतर कर्नाटकात नेऊन ठेवले. त्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी मुलीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. अखेर पीएसआय आर्सेकर, सपना गावस, पोलीस कॉ. सुजय नाईक, पवन लोटलीकर आणि अक्षता होस्पिते यांच्या पथकाने कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील हॉस्पेट येथे मुलीचा ठावठिकाणा शोधून काढला. तेथे तिची सुटका करून आरोपी वलिकार याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला वेर्णा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
आरोपीला वास्को येथील जेएमएफसी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
मुलीच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेसह पॉक्सो कायद्यातील आणखी काही कलमे जोडली आहेत. या आरोपांबाबत पुढील तपास सुरू असून, प्रकरणातील अधिक पुरावे मिळविण्यासाठी आरोपीची चौकशी करण्यात येत आहे.
वेर्णा पोलीस ठाण्याच्या सपना गावस पुढील तपास करीत आहेत. पोलीस निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या देखरेखीखाली तसेच मुरगावचे उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
मारहाण करून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप
सुटका करण्यात आलेल्या मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात आरोपीने आपल्याला मारहाण करून शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. आरोपीने तिचे अश्लील व्हिडिओ तसेच छायाचित्रे काढली आणि ती सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिल्याचा आरोपही मुलीने केला आहे.


