मडगाव : दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात खाटांसह आवश्यक वैद्यकीय सुविधांचा गंभीर तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णालयाचे रिकामे असलेले दोन मजले तातडीने रुग्णसेवेसाठी खुले करण्यात यावेत. येत्या महिन्याभरात या सुविधा उपलब्ध करून न दिल्यास न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल केली जाईल आणि जनआंदोलन उभारून संपूर्ण सासष्टी तालुका बंद पाडला जाईल, असा थेट इशारा गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी दिला आहे.
आमदार विजय सरदेसाई यांनी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. या पाहणीदरम्यान अनेक रुग्णांना खाटा उपलब्ध न झाल्याने खुर्चीवर अथवा स्ट्रेचरवर बसून उपचार घ्यावे लागत असल्याचे चित्र दिसून आले. पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी रुग्णालयातील प्रशासकीय आणि भौतिक त्रुटींवर बोट ठेवले. रुग्णालयाचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) योग्यरीत्या चालत नसल्याने परिसरात सांडपाणी साचत आहे, तसेच स्वच्छतागृहांची दुरवस्था झालेली आहे. दक्षिण गोव्याची मोठी जबाबदारी असलेल्या या रुग्णालयात डायलिसिससाठी केवळ सहा खाटा उपलब्ध असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
हे रुग्णालय म्हणजे सासष्टी तालुक्यातील जनतेवर झालेल्या अन्यायाचे प्रतीक बनले असून ते सध्या कोमात गेल्यासारखी स्थिती आहे. एम्सच्या धर्तीवर अतिविशेषोपचार सुविधा देण्याचे आश्वासन देऊन उभारलेले हे रुग्णालय केवळ रुग्णांना इतरत्र पाठवणारे रेफरल केंद्र बनले आहे, असा आरोप सरदेसाई यांनी केला. रुग्णालयात मल्टीस्पेशालिटी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी गोवा फॉरवर्ड पक्षाने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी सरकारने सर्व आवश्यक सुविधा पुरवण्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले होते. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
रुग्णालयातील रिकामे असलेले दोन मजले तातडीने रुग्णांच्या खाटांसाठी वापरावेत, अन्यथा न्यायालयात अवमान याचिका दाखल केली जाईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला. आपत्कालीन कोविड काळात हे रुग्णालय सुरू करण्यात आले असले तरी सध्या त्याची अवस्था बिकट झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधांपासून वंचित ठेवले जात असून, हाच विषय आगामी निवडणुकीतील प्रमुख मुद्दा राहील, असेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले.


