फोंडा कदंब बसस्थानक सुविधांपासून वंचित

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
27th September, 11:59 pm
फोंडा कदंब बसस्थानक सुविधांपासून वंचित

फोंडा : शापूर-बांदोडा येथील आंतरराज्य कदंब बसस्थानकात अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. बसस्थानकावरील नळ गेल्या कित्येक वर्षांपासून कोरडे पडले असून, पिण्याच्या पाण्यासाठी प्रवाशांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. त्याचबरोबर बसस्थानक परिसरात खासगी बसेस आणि दुचाकींचे बेशिस्त पार्किंग होत असल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. विविध समस्यांच्या विळख्यात असलेल्या या बसस्थानकात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
या बसस्थानकातून खासगी तसेच कदंब बसेसची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. पणजी, म्हापसा, साखळी, मोले, सावर्डे, वास्को, मडगाव तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही भागांना जोडणाऱ्या बसेसची संख्या वाढत आहे. त्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांचीही मोठी वर्दळ असते. मात्र, प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.
बसस्थानक परिसरात अनेक खासगी बसेस दिवसभर पार्क केल्या जात असल्याने नियमित वाहतूक करणाऱ्या बसेसना अडथळा निर्माण होतो. विशेषतः पणजीला जाणाऱ्या बसेसच्या थांब्याजवळ खासगी प्रवासी बसेस पार्क करून ठेवल्या जातात. त्यामुळे कदंब बसेसना थांब्यावर जागा न मिळाल्याने रस्त्यावर उभे राहून प्रवाशांची चढ-उतार करण्याची वेळ चालकांवर येते. यामुळे वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
बसस्थानकावर कदंब बसचालकांसाठी अद्याप विश्रांतीगृहाची सुविधा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे फेऱ्यांदरम्यान चालकांना उभे राहावे लागते. चालकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही होत आहे.
काही वर्षांपूर्वी बसस्थानकाच्या छपराचा लोखंडी भाग कोसळला होता. तसेच दोन-तीन वेळा स्लॅबचे तुकडे पार्क केलेल्या खासगी बसवर कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनांची दखल घेऊन कदंब महामंडळाने बसस्थानकाची दुरुस्ती केली होती. आता बसस्थानकात आणखी बदल व सुधारणा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
प्रवासी प्रवीण नाईक यांच्या म्हणण्यानुसार, परिसरात दुचाकींचेही बेशिस्त पार्किंग केले जाते. सकाळी वाहने पार्क करून चालक संध्याकाळी ती घेऊन जात असल्याने प्रवासी आणि बसवाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पाणी, पार्किंग, विश्रांतीगृह तसेच अन्य मूलभूत सुविधांबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
रात्री गुरांचा वावर; बाकड्यांचीही दुरवस्था
बसस्थानक परिसरात रात्रीच्या वेळी गुरांचा वावर वाढला असून, अनेक खासगी बसेस दीर्घकाळ पार्क केलेल्या अवस्थेत आहेत. प्रवाशांसाठी असलेली बाकडीही बदलण्याची गरज आहे. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बसस्थानकाच्या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी युवक विशाल फडते यांनी केली.

हेही वाचा
सर्व पहा