ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपी सापडला उडुपीच्या रस्त्यावर

रशियन नागरिक इसाएवला आणले गोव्यात


27th September, 10:58 pm
ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपी सापडला उडुपीच्या रस्त्यावर

कारवार : पाच वर्षांपासून गोवा पोलिसांच्या नजरेआड असलेला रशियन नागरिक कॉन्स्टँटिन इसाएव अखेर कर्नाटकातील उडुपी येथे सापडला. काही दिवसांपूर्वी तो उडुपीच्या रस्त्यावर असहाय्य अवस्थेत कोसळलेला आढळला होता. त्यावेळी समाजसेवकाने त्याला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, पुढील तपासात हा साधा पर्यटक नसून २०१९च्या अमली पदार्थ प्रकरणातील गोवा पोलिसांना हवा असलेला फरार आरोपी असल्याचे समोर आले.

२० सप्टेंबरच्या रात्री उडुपीतील कल्याणपूर-संतेकट्टे सेवा रस्त्यावर एक परदेशी नागरिक आढळून आला. तो असहाय्य स्थितीत असल्याचे लक्षात आल्यानंतर समाजसेवक नित्यानंद ओळकाडू यांनी त्याला मदत केली. त्याला अज्जरकाडू जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात दाखल करण्यात आलेला नागरिक रशियन असल्याचे समोर आले. तो भारतातील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी आला असल्याची प्राथमिक माहिती त्यावेळी देण्यात आली होती. परदेशी नागरिक असल्याने नित्यानंद ओळकाडू यांनी या घटनेची माहिती उडुपी शहर पोलिसांना दिली.

दरम्यान, पोलिसांच्या तपासात या रशियन नागरिकाची ओळख कॉन्स्टँटिन इसाएव अशी पटली. त्यानंतर त्याची पार्श्वभूमी तपासली असता तो गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाला हवा असलेला आरोपी असल्याचे स्पष्ट झाले.

इसाएवविरुद्ध जानेवारी २०१९ मध्ये गोवा येथे अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. त्याच्याकडून १५.९८ ग्रॅम एमडीएमए जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात त्याला अटक झाल्यानंतर जुलै २०१९ मध्ये जामीन मिळाला. मात्र, त्यानंतर तो न्यायालयीन प्रक्रियेला हजर राहिला नाही आणि फरार झाला.

त्याच्याविरुद्ध अतिरिक्त सत्र न्यायालयाने ऑगस्ट २०२१ मध्ये अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते.

माहिती मिळताच गोवा अमली पदार्थविरोधी पथकाचे विशेष पथक कर्नाटकात पोहोचले. उडुपी पोलिसांच्या समन्वयाने इसाएवला ताब्यात घेऊन गोव्यात आणण्यात आले. गोव्यात आणल्यानंतर इसाएवला मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

सीमकार्ड, भ्रमणध्वनी बदलून पोलिसांना चकवा

गोवा पोलिसांच्या माहितीनुसार, इसाएवने पोलिसांच्या नजरेपासून दूर राहण्यासाठी वारंवार भ्रमणध्वनी आणि सीमकार्ड बदलले. त्याचे कायमस्वरूपी वास्तव्य नसल्याने त्याचा ठावठिकाणा शोधणे पोलिसांसाठी आव्हान ठरले होते. 

हेही वाचा
सर्व पहा