दुचाकीची ठोकर बसून पर्वरी येथे पादचाऱ्याचा मृत्यू

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
28th September, 11:51 pm
दुचाकीची ठोकर बसून पर्वरी येथे पादचाऱ्याचा मृत्यू

म्हापसा : सालय, पर्वरी येथे दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेला पादचारी रामचंद्र श्रृंगारे (६६, रा. साल्वादोर द मुंद) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी संशयित आरोपी निलरतन नीळकंठ कुंडा (३२, रा. साल्वादोर द मुंद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हा अपघात रविवारी रात्री १०.५५ च्या सुमारास थॉमस स्टीफन्स कोकणी केंद्राजवळ घडला होता. संशयित दुचाकीस्वार निलरतन कुंडा हा आपल्या जीए ०३ बीई ८०९५ क्रमांकाच्या दुचाकीवरून ओकोकेरोहून बी. बी. बोरकर रस्त्याने साल्वादोर द मुंद येथे घरी जात होता. तर त्याच रस्त्याने रामचंद्र श्रृंगारे हा पादचारी देखील चालत घरी जात होता.
तेव्हा घटनास्थळी दुचाकीने पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या अपघातात पादचारी व संशयित दुचाकीस्वार हे दोघेही जखमी झाले. दोघांनाही उपचारार्थ गोमेकॉमध्ये रुग्णवाहिकेतून दाखल करण्यात आले. सोमवारी २८ रोजी सायंकाळी जबर जखमी रामचंद्र श्रृंगारे यांचे उपचारादरम्यान निधन झाले. तर संशयित दुचाकीस्वाराला उपचारानंतर घरी पाठवण्यात आले.
पोलीस हवालदार विवेकानंद दिवकर यांच्या तक्रारीच्या आधारे पर्वरी पोलिसांनी संशयित दुचाकीस्वाराविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम २८१ व १०६(१) अन्वये निष्काळजीपणे वाहन हाकून निष्पाप पादचाऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सीताराम मळीक हे करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा