बीएसएनएलच्या तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
28th September, 11:58 pm
बीएसएनएलच्या तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मडगाव : दक्षिण गोव्यात विविध ठिकाणी बीएसएनएलच्या पिलर कॅबिनेटची कुलपे तोडून तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा फातोर्डा पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील मेरठ येथील सहा संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १६५.१९० किलो तांब्याच्या तारा व अन्य धातूचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. सर्व संशयितांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बीएसएनएलच्या उपविभागीय अभियंता स्नेहा गावकर यांच्या तक्रारीवरून फातोर्डा स्टेडियमजवळील पिलर कॅबिनेट फोडून टॅग ब्लॉक्स व तांब्याच्या तारा चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोलवा, वेर्णा, फातोर्डा, मडगाव आणि मायणा-कुडतरी पोलीस ठाण्यांत अशा चोरीचे एकूण १० गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण, नागरिकांनी दिलेली छायाचित्रे तसेच संशयितांच्या भ्रमणध्वनीच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू ठेवला. त्याद्वारे २३ सप्टेंबर रोजी तिघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून कटर, परावर्तित जॅकेट व चोरीच्या वेळी वापरलेले कपडे मिळाले.

साताऱ्यातून आणखी तिघांना अटक
चौकशीत मडगाव, फातोर्डा, कोलवा, मायणा-कुडतरी व वास्को परिसरात चोरी केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर मोहम्मद अस्लम (३४), शाहरुख मलिक (२८) आणि साहिल मलिक (३०) यांना अटक करण्यात आली. पुढील तपासासाठी पोलीस पथक महाराष्ट्रातील सातारा येथे गेले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आणि भ्रमणध्वनीच्या ठिकाणाच्या आधारे समीर मोहम्मद अस्लम (२३), साकिब सरफराज (२४) व हसनैन हाशिम कुरेशी (२४) या आणखी तिघांना २७ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. हे सर्व संशयित मेरठ येथील रहिवासी आहेत.
ही कारवाई दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अक्षत आयुष व उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली फातोर्डा पोलीस निरीक्षक राहुल नाईक, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रामराय नाईक आणि त्यांच्या पथकाने केली.


‍चोरीचा माल खरेदी करणारा फरार
मोहम्मद अस्लम याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी १६५.१९० किलो तांब्याच्या तारा व अन्य धातूचे साहित्य हस्तगत केले. चोरीचा माल खरेदी करणारा मेरठ येथील साबिर अद्याप फरार असून, त्याच्या घरी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही संशयितांचा सहभाग असल्याची शक्यता असून तपास सुरू आहे.      

हेही वाचा
सर्व पहा