बायंगिणी कचरा प्रकल्प : सल्लागार कंपनीच्या निवडीसाठी निविदा

बायंगिणी येथे १०० टन प्रति दिन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या कामासाठी सल्लागार कंपनीची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी ‘आरएफपी’ निविदा जारी करण्यात आली आहे. इच्छुकांना ऑनलाईन पद्धतीने निविदा सादर करण्यासाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.


28th September, 11:42 pm
बायंगिणी कचरा प्रकल्प : सल्लागार कंपनीच्या निवडीसाठी निविदा

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
बायंगिणी येथे १०० टन प्रति दिन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या कामासाठी सल्लागार कंपनीची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी ‘आरएफपी’ निविदा जारी करण्यात आली आहे. कचरा व्यवस्थापन महामंडळाने ही निविदा प्रसिद्ध केली आहे. इच्छुकांना ऑनलाईन पद्धतीने निविदा सादर करण्यासाठी २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
हा प्रकल्प उभारण्यासाठी बोली लावणाऱ्या कंपन्यांपैकी ४ कंपन्या तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरल्या आहेत. या कंपन्यांमधून अंतिम सल्लागार कंपनीची निवड केली जाईल. सल्लागार निवडीसाठी निविदा जारी झाल्यामुळे बायंगिणी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणीच्या हालचालींना वेग आला आहे. या प्रकल्पात प्रामुख्याने पणजी महानगरपालिकेच्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे महापालिका आणि आमदार बाबूश मॉन्सेरात यांच्याकडून या प्रकल्पाचा पाठपुरावा केला जात आहे. आगामी निवडणुकीपूर्वी सल्लागार कंपनीची निवड होऊन प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू होण्याची दाट शक्यता आहे.
प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध
स्थानिक आमदार राजेश फळदेसाई आणि जुने गोवे पंचायतीचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. हा मुद्दा विधानसभेतही अनेकदा गाजला आहे. जागतिक वारसा स्थळ असलेले ऐतिहासिक ‘बॅसिलिका ऑफ बॉम जिझस’ चर्च या परिसराजवळ आहे. कचरा प्रकल्पामुळे या ऐतिहासिक वास्तूला धोका निर्माण होईल, अशी भीती विरोधक व्यक्त करत आहेत. प्रकल्पादरम्यान योग्य ती खबरदारी घेतली जाईल, त्यामुळे चर्च आणि पर्यावरणाला धोका पोहोचणार नाही, असा दावा सरकारकडून केला जात आहे.

हेही वाचा
सर्व पहा