कुडचडे 'रोड-रेज' प्रकरण: भाजप आमदार राजेश फळदेसाई यांच्या पुत्रावर तक्रार दाखल

कुडचडे येथे घडलेल्या 'रोड-रेज' आणि वाहनाचा पाठलाग प्रकरणी कुंभारजुवेचे भाजप आमदार राजेश फळदेसाई यांचा मुलगा राहुल व अन्य तिघांविरोधात तक्रार दाखल झाली असून, मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कारवाईचे आदेश दिले आहेत.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
कुडचडे 'रोड-रेज' प्रकरण: भाजप आमदार राजेश फळदेसाई यांच्या पुत्रावर तक्रार दाखल

पणजी : कुंभारजुवे मतदारसंघाचे भाजप आमदार राजेश फळदेसाई यांचा मुलगा राहुल फळदेसाई आणि त्याच्या तीन अज्ञात साथीदारांविरोधात कुडचडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी कुडचडे येथील पंटेमळ जंक्शनजवळ हा प्रकार घडला. ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या तक्रारीनुसार, मडगावच्या दिशेने प्रवास करत असताना संशयित राहुल फळदेसाई आणि त्याच्या साथीदारांनी वाहनाचा पाठलाग करत शिवाजी सर्कल ते आंबेडकर सर्कलपर्यंत पाठलाग केला, तसेच वाहनातील सदस्यांना अश्लील शिवीगाळ करत धमकावण्याचा प्रयत्न केला.



तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी तक्रारदाराच्या कुटुंबाच्या वाहनावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी तक्रार नोंदवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. सध्या कुडचडे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



कुडचडे येथील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेतील दोषींवर कायदेशीर प्रक्रियेनुसार कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. 

हेही वाचा
सर्व पहा