मडगाव : एसआयआर प्रक्रियेच्या माध्यमातून मतदार यादीतून चुकीच्या पद्धतीने नावे वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेस पक्षाच्या वतीने मडगावात तीव्र निदर्शने करण्यात आली. दक्षिण गोवा जिल्हा कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. या आंदोलनादरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिमेचे दहन करून एसआयआर प्रक्रियेतील कथित घोटाळ्याचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला. या निदर्शनांमध्ये विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. शेख आणि दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
.
निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची टीका
निदर्शनांनंतर पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर आणि स्वायत्ततेवर प्रश्न उपस्थित केले. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यकाळात इतर निवडणूक आयुक्तांना विश्वासात न घेता निर्णय घेतले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. निवडणूक आयोगातील अन्य आयुक्तांनी उपस्थित केलेले आक्षेप डावलून एकतर्फी निर्णय घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात लाखो मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली गेली असून, गोव्यातही १.२७ लाख मतदारांची नावे यादीतून हटवण्यात आली आहेत. मृत किंवा दुबार मतदारांची नावे हटवण्यास काँग्रेसचा कोणताही विरोध नाही, मात्र जिवंत आणि वैध मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने वगळण्याला पक्षाचा तीव्र आक्षेप असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रक्रिया पुन्हा राबवण्याची आणि चौकशीची मागणी
या वेळी बोलताना खासदार विरियातो फर्नांडिस यांनी एसआयआर प्रक्रियेतील त्रुटींवर बोट ठेवले. संविधानाने दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचे जतन करण्यासाठी संपूर्ण एसआयआर प्रक्रिया पारदर्शकपणे पुन्हा राबवण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली. निवडणूक आयोगाने कोणत्याही राजकीय दबावाखाली काम न करता निष्पक्ष भूमिका बजावली पाहिजे. देशातील लोकशाही व्यवस्था आणि नागरिकांचे घटनात्मक हक्क अबाधित राखण्यासाठी काँग्रेस पक्ष सर्वसामान्य जनता आणि तरुणांना सोबत घेऊन हा लढा सातत्याने सुरू ठेवेल, असा पुनरुच्चार काँग्रेस नेत्यांनी या वेळी केला.



