गोव्यातील नद्यांचे जतन ही लोकचळवळ व्हावी; जागतिक नदी दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

जागतिक नदी दिनानिमित्त साखळी येथील वाळवंटी नदीकाठी पार पडलेल्या नदी पूजन प्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नद्यांचे प्रदूषण रोखणे आणि स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी असल्याचे सांगितले. .

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
गोव्यातील नद्यांचे जतन ही लोकचळवळ व्हावी; जागतिक नदी दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

पणजी : जागतिक नदी दिनाचे औचित्य साधून साखळी येथील विठ्ठलापूर परिसरात वाळवंटी नदीच्या काठावर विशेष नदी पूजन आणि आरती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विठ्ठल मंदिर परिसरात स्थानिक नागरिक, महिला आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाळवंटी नदीची विधीवत पूजा व आरती केली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः कधीही नदी प्रदूषित करणार नाही असा संकल्प करत उपस्थित सर्व नागरिकांनाही नद्या स्वच्छ राखण्याची शपथ दिली.



नद्यांचे अस्तित्व टिकवून ठेवणे ही नागरिकांची नैतिक जबाबदारी

नद्या या केवळ पाण्याचे स्रोत नसून गोव्याची खरी जीवनदायिनी आहेत. पिण्याच्या पाण्यापासून ते शेतीच्या सिंचनापर्यंत नद्यांचे योगदान अत्यंत अमूल्य आहे. त्यामुळे राज्यातील सर्व नद्या प्रदूषणमुक्त ठेवणे, कचरा न टाकणे आणि त्यांचे जतन करणे ही केवळ सरकारचीच नाही तर प्रत्येक गोवेकराची वैयक्तिक आणि नैतिक जबाबदारी आहे. नद्यांचे सौंदर्य आणि स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी संपूर्ण जगात एक सकारात्मक संदेश जावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कचरा व सांडपाण्याच्या नद्यांतील निचऱ्यावर कडक निर्बंधांची गरज

नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी शासन आपल्या पातळीवर विविध उपाययोजना राबवत आहे. परंतु, व्यावसायिक आस्थापनांनी थेट नद्यांमध्ये दूषित सांडपाणी सोडणे तातडीने बंद केले पाहिजे. नागरिक आणि उद्योगांनी कचरा नदीपात्रात टाकणे थांबवले तरच नद्यांचे नैसर्गिक स्वरूप टिकून राहील. अल्प कालावधीत आयोजित या कार्यक्रमाला कारापूर-विठ्ठलपूर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून पर्यावरण रक्षणाचा ध्यास दाखवून दिला, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले.


हेही वाचा
सर्व पहा