सप्टेंबरमधील पावसाच्या दडीमुळे राज्यातील शेती धोक्यात

कृषी संचालकांचे पाहणीचे निर्देश : दुष्काळसदृश परिस्थिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th September, 10:27 pm
सप्टेंबरमधील पावसाच्या दडीमुळे राज्यातील शेती धोक्यात

यंदा पावसाचे प्रमाण आधीच कमी असताना, सप्टेंबरमध्ये पावसाने दडी मारल्याने राज्यातील शेतीचे नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे. या सद्यस्थितीचा अंदाज घेण्यासाठी विभागीय कृषी अधिकाऱ्यांना शेतीची पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती कृषी संचालक चंद्रहास देसाई यांनी दिली.

सप्टेंबरमध्ये एकही दिवस १ इंचापेक्षा जास्त पाऊस पडलेला नाही. पाऊस कमी पडत असतानाच तापमान मात्र वाढू लागले आहे, ज्यामुळे रोपांची मुळे करपण्यास सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला असून, दोन-तीन दिवस पाऊस पडल्यास परिस्थिती सुधारेल. मात्र, सध्या पाऊस नसल्याने शेती आणि बागायतीसाठी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

पावसात ३१ टक्के तूटआतापर्यंत गोव्यात सरासरी ८०.९२ इंच पाऊस पडला असून, पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ३१ टक्के कमी आहे. २३ सप्टेंबर रोजी सर्वाधिक २९.९ मिमी पावसाची नोंद झाली. महिनाभरात पावसाच्या तुरळक सरी पडल्या, मात्र त्या फार काळ टिकल्या नाहीत. ज्या भागात पाऊस पडलेला नाही, तेथील पिके करपण्याची भीती आहे. अद्याप नुकसानीबाबत तक्रारी आलेल्या नसल्या तरी पाहणीनंतरच परिस्थिती स्पष्ट होईल, असे कृषी संचालक चंद्रहास देसाई यांनी सांगितले.

चिंचिणीत १०० हेक्टरवर लागवड

यंदा पहिल्यांदा रोपे लावल्यानंतर पाऊस न आल्याने ती वाया गेली, त्यामुळे आम्ही पुन्हा रोपे लावली आहेत. दोन दिवसांपूर्वी पावसाच्या तुरळक सरी पडल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.

चिंचिणी येथे कृषी क्लबतर्फे १०० हेक्टर जमिनीत भाताची लागवड केली जाते. मात्र, या आठवड्यात पाऊस पडला नाही तर पिकाला फटका बसेल, असे चिंचिणी कृषी क्लबचे अध्यक्ष आग्नेल फुर्तादो यांनी सांगितले.

पिकांना थंडाव्याची नितांत गरज

  1. यापूर्वी अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यावर शेतकरी आधार निधीअंतर्गत सरकारने नुकसानभरपाई दिली होती. यंदा अतिवृष्टी झाली नसली तरी जमीन सुकू लागली आहे.
  2. पीक तयार झाल्यानंतर आता पिकांना थंडाव्याची नितांत गरज आहे, असे फुर्तादो यांनी स्पष्ट केले.
  3. गेल्या तीन-चार वर्षांच्या तुलनेत यंदा पावसाला उशिरा सुरुवात झाली आणि आता भाताला कणसे आल्यावर पुन्हा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे.
विविध भागांत नोंद झालेला पाऊस
ठिकाणपाऊस (मिमी)
म्हापसा१,५८२.२
पेडणे१,९३९.६
पणजी१,३८५.०
जुने गोवा१,८०४.२
साखळी२,०७८.०
वाळपई२,८३६.७
फोंडा१,९५४.६
धारबांदोडा२,८०६.८
काणकोण२,२१८.६
दाबोळी१,५७५.१
मडगाव२,०४२.५
मुरगाव१,५२७.१
केपे२,४४५.७
सांगे२,६३४.८

विविध भागांतील पावसाचे तुलनात्मक चित्र

नोंद झालेला पाऊस : मिमी
वाळपई२,८३६.७
धारबांदोडा२,८०६.८
सांगे२,६३४.८
केपे२,४४५.७
काणकोण२,२१८.६
साखळी२,०७८.०
मडगाव२,०४२.५
फोंडा१,९५४.६
पेडणे१,९३९.६
जुने गोवा१,८०४.२
म्हापसा१,५८२.२
दाबोळी१,५७५.१
मुरगाव१,५२७.१
पणजी१,३८५.०
नोंद : तुलनात्मक बार-चार्टमध्ये सर्वाधिक नोंद झालेल्या २,८३६.७ मिमी पावसाला १००% प्रमाण मानून इतर ठिकाणांचे सापेक्ष प्रमाण दाखवले आहे.

पावसाअभावी पिकांवर परिणाम होण्याची भीती

पाऊस कमी पडत असतानाच तापमान वाढत असल्याने पिकांवर त्याचा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेषतः भात पिकाची स्थिती आणि पावसाच्या उपलब्धतेचा कृषी विभागाकडून आढावा घेतला जाणार आहे. विभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर प्रत्यक्ष नुकसानीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा