पणजी : इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांच्यात काल रविवारी रात्री उशिरा पार पडलेल्या तातडीच्या बैठकीनंतर २८ सप्टेंबरपासून नियोजित असलेला तीन दिवसांचा बँक संप तुर्तास स्थगित करण्यात आला आहे. गोवा युनिटचे निमंत्रक संतोष हळदणकर यांनी या निर्णयाबाबत अधिकृत माहिती दिली आहे. वरिष्ठ पातळीवरून मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, राज्यातील व देशभरातील सर्व बँक शाखा पूर्ववत उघड्या राहून कामकाज सुरळीत सुरू झाले आहे.

युनियनच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे की, हा संप पूर्णपणे रद्द झालेला नसून केवळ पुढे ढकलण्यात आला आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर योग्य तोडगा काढण्यासाठी आयबीएने केंद्रीय प्रतिनिधींसोबत रात्री उशिरापर्यंत चर्चा केली. या बैठकीनंतर युनियन मुख्यालयाकडून संप स्थगितीचा संदेश प्राप्त झाला. बँक कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आठवड्यात ५ दिवसांचे कामकाज लागू करणे आणि सर्व कर्मचाऱ्यांसाठी एकसमान परफॉर्मन्स लिंक इन्सेंटिव्ह (Uniform PLI) निश्चित करणे ही आहे.

कामगार हक्कांच्या दृष्टिकोनातून बोलताना हळदणकर यांनी नमूद केले की, संप करणे हा कर्मचाऱ्यांसाठी नेहमीच शेवटचा मार्ग असतो, कारण संपामुळे कर्मचाऱ्यांचे स्वतःचे एका दिवसाचे वेतन कापले जाते. मात्र, सेवा सुधारणा आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी संघटनांना असे पाऊल उचलावे लागते. सध्या प्रशासनाकडून सकारात्मक संकेत मिळाल्याने संपाची पुढील दिशा आयबीएसोबत होणाऱ्या आगामी बैठकीतील निर्णयावर अवलंबून असणार आहे असे ते म्हणाले.


