कासारवर्णेतील सरकारी शाळेत अज्ञातांकडून मद्यपान; वर्गाच्या खिडक्या फोडल्या

कासारवर्णेतील सरकारी शाळेत अज्ञात व्यक्तींनी प्रवेश करून मद्यपान केले. यानंतर वर्गातील खिडक्यांच्या काचा फोडल्या असून, दारूच्या बाटल्या याठिकाणी आढळून आल्या आहेत; मोपा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
1 hours ago
कासारवर्णेतील सरकारी शाळेत अज्ञातांकडून मद्यपान; वर्गाच्या खिडक्या फोडल्या

पणजी : पेडणे तालुक्यातील कासारवर्णे येथील सरकारी प्राथमिक शाळेत अज्ञातांनी घुसून तोडफोड केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. अज्ञातांनी वर्गातील खिडक्यांच्या काचा फोडल्या असून, रात्री दारू पिऊन बाटल्याही येथेच टाकून दिल्या आहेत . या प्रकारामुळे स्थानिक ग्रामस्थ, शिक्षक आणि पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.





मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे सकाळी शाळेचे कर्मचारी येथे आले असता त्यांना शाळेच्या वर्गातील खिडक्यांच्या काचा फुटलेल्या स्थितीत आढळून आल्या.अज्ञातांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत शाळेच्या आवारात मद्यप्राशन केले असावे आणि त्यानंतर खिडक्यांच्या काचांची तोडफोड केली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. 



घटनेची माहिती मिळताच मोपा पोलीस ठाण्याचे पथक आणि शिक्षण खात्याचे संबंधित अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराचा पंचनामा केला असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. शाळा परिसरात अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या दोषींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी कासारवर्णेतील ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा
सर्व पहा