एकाच मतदारसंघात अनेक इच्छुक असणे ही पक्षाची ताकद : गिरीश चोडणकर

कळंगूटमध्ये 'गोवा राखण यात्रे'दरम्यान काँग्रेसने पक्षांतरितांच्या पुतळ्यांचे दहन करत लोबो कुटुंबावर टीका केली, तर निवडणुकीनंतरच मुख्यमंत्रिपदाचा निर्णय आमदारांशी चर्चा करून हायकमांड घेईल, असे माणिकराव ठाकरे आणि गिरीश चोडणकर यांनी स्पष्ट केले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
17 mins ago
एकाच मतदारसंघात अनेक इच्छुक असणे ही पक्षाची ताकद : गिरीश चोडणकर

पणजी : गोव्यात काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेली 'गोय राखण यात्रा' सध्या राज्यभरात जोरदार चर्चेत असून या यात्रेच्या सहाव्या दिवशी कळंगूट येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी स्थानिक आमदार मायकल लोबो आणि त्यांच्या कुटुंबावर अतिशय कठोर शब्दांत राजकीय निशाणा साधला. लोबो कुटुंब म्हणजे राजकारणातील एक "प्रायव्हेट लिमिटेड कंपनी" बनली आहे, असा थेट आरोप त्यांनी या वेळी केला. स्वार्थी राजकारणासाठी आणि वैयक्तिक फायद्यासाठी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना गोव्याची जनता कधीही माफ करणार नाही, असे सांगत युरी आलेमाव यांनी राज्यातील वाढत्या पक्षांतराविरोधात सर्व गोवेकरांनी एकजुटीने पुढे येऊन लढा देण्याचे आवाहन केले.

पक्षांतर करणाऱ्या आमदारांच्या पुतळ्यांचे दहन अन् तीव्र निदर्शने

या सभेदरम्यान काँग्रेस कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी पक्षांतराच्या विरोधात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. काँग्रेस पक्षाशी प्रतारणा करून इतर पक्षात प्रवेश केलेल्या आठ माजी आमदारांच्या पुतळ्याचे जाहीरपणे दहन करण्यात आले. राजकीय तत्त्वे बाजूला ठेवून सत्ता आणि पदासाठी पक्षांतर करणाऱ्या या नेत्यांचा निषेध नोंदवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत घोषणाबाजी केली. या आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेसने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेत पक्षांतराच्या मुद्द्यावरून जनजागृती करण्याचा आणि फुटीरतावादी राजकारणाला चाप लावण्याचा स्पष्ट संदेश दिला.

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडणुकीनंतरच; माणिकराव ठाकरे यांचे स्पष्टीकरण

गोवा राखण यात्रेत पत्रकारांनी काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांची भेट घेऊन २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, असा थेट प्रश्न विचारला. यावर स्पष्टीकरण देताना ठाकरे म्हणाले की, काँग्रेस पक्षात निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्याची कोणतीही परंपरा किंवा पद्धत नाही. निवडणूक संपल्यानंतर सर्व निवडून आलेले आमदार एकत्रित येतात, त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाते आणि त्यानंतर पक्षाचे केंद्रीय नेतृत्व म्हणजेच हायकमांड मुख्यमंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय घेते. सध्या ही यात्रा युरी आलेमाव, अमित पाटकर, ॲड. कार्लोस अल्वारेस फेरेरा, गिरीश चोडणकर आणि कॅप्टन व्हिरियातो फर्नांडिस या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली यशस्वीपणे सुरू असून सर्व नेते पक्षाचे संघटन मजबूत करत असल्याचे त्यांनी नमूद केले.   

एकाच मतदारसंघात अनेक इच्छुक असणे ही पक्षाची ताकद : गिरीश चोडणकर

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनाही पत्रकारांनी गाठले. युरी आलेमाव हे 'गोय राखण यात्रे'चे नेतृत्व करत असल्यामुळे त्यांनाच आगामी निवडणुकीत काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे केले जात आहे का, असा प्रश्न चोडणकर यांना विचारण्यात आला. यावर बोलताना चोडणकर यांनी स्पष्ट केले की, युरी आलेमाव हे विरोधी पक्षनेते म्हणून विधानसभेत आणि रस्त्यावर पक्षाचा आवाज उठवत आहेत व यात्रेचे नेतृत्व करत आहेत. मात्र, काँग्रेसच्या परंपरेनुसार निवडणुकीआधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केला जात नाही. निवडणूक जिंकून आमदार निवडून आल्यावरच मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतला जातो. 

एकाच मतदारसंघात काँग्रेसचे दोन-तीन इच्छुक उमेदवार दावेदारी करत असल्याचे चित्र स्पष्ट होत असल्याबद्दल विचारले असता चोडणकर म्हणाले की, एकाच मतदारसंघात एकापेक्षा जास्त सक्षम उमेदवार असणे हे काँग्रेस पक्षाची वाढती ताकद आणि लोकप्रियता दर्शवते. गोव्यात काँग्रेसचा राजकीय आलेख आणि जनतेचा विश्वास वेगाने उंचावत असल्यामुळेच पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या मोठी आहे. उमेदवारी निश्चित करताना स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जाईल आणि पक्षाचा निर्णय सर्व कार्यकर्ते शिस्तीने मान्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, 'गोवा राखण यात्रा' २९ सप्टेंबर रोजी मांद्रे मतदारसंघात प्रवेश करणार आहे. मोरजी-चोपडे जंक्शनवरून ही यात्रा पुढे जाणार असून या यात्रेच्या स्वागतासाठी आणि नियोजनासाठी मांद्रे काँग्रेस ब्लॉक कमिटीतर्फे विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

आरजीपी-काँग्रेस युतीची आज चर्चा : आरजीपी १५ जागांची मागणी करू शकते

रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीची युती समिती आणि काँग्रेसची युती समिती यांची दुपारी १:३० वाजता बैठक होण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, यावेळी तिसवाडी तालुक्यातील सांताक्रूझ, सांत आंद्रे आणि कुंभारजुवे या जागांसह आरजीपी १५ जागांची मागणी करण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा
सर्व पहा