पणजी बाजारात कांद्याचे दर चढेच, लसूण ५०० रुपये किलो

पणजी बाजारात कांदा, लसूण आणि आल्यासह भाजीपाल्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. लसूण ५०० रुपये किलोवर पोहोचला असून, फलोत्पादन मंडळाच्या विक्री केंद्रांवर मात्र भाज्या वाजवी दरात उपलब्ध आहेत.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
17 mins ago
पणजी बाजारात कांद्याचे दर चढेच, लसूण ५०० रुपये किलो

पणजी : मागील काही आठवड्यांपासून राज्यात कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या बाजारात काही प्रमाणात नवीन कांदा उपलब्ध झाला आहे. असे असले तरी त्याचे दर अद्याप चढेच आहेत. सोमवारी पणजी बाजारात नवीन कांदा ६५ ते ७० रुपये, तर जुना कांदा ८० रुपये किलो दराने विकला जात होता. लसणाचे दरदेखील वाढले आहेत. आकारानुसार लसूण ५०० ते ६०० रुपये किलो झाला आहे. आल्याचे दर वाढून ३०० रुपये किलो झाले आहेत.

पुढील काही दिवस ही दरवाढ कायम असण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. बाजारात लहान नारळ ३० रुपये, मध्यम आकाराचा नारळ ५० रुपये, तर मोठा नारळ ६० रुपये नग होता. वालपापडीचे दर दर्जानुसार ९० ते १२० रुपये किलो होते. फ्लॉवर ५० रुपये तर कोबी ४० रुपयांना होती. मिरची आणि ढब्बू मिरची दर्जानुसार अनुक्रमे १०० ते १२० रुपये किलो दराने विकली जात होती. टोमॅटो ४० रुपये तर बटाटा ५० रुपये किलो होता. बाजारात गवार ८० रुपये किलो होती.

बाजारात लहान वांगी ६० तर मोठी वांगी ८० रुपये किलो होती. गाजर, कारले आणि बीट प्रत्येकी ८० रुपये किलो होते. दुधी भोपळा ५० रुपयांना नग होता. मटार १५० ते १८० रुपये किलो होते. दोडका १०० रुपये तर भेंडी ८० रुपये किलो होती. मेथी २५ रुपये तर शेपू २५ रुपये जुडी होती. पालकाची जुडी २० रुपये होती. कोथिंबिरीचे दर २० रुपये जुडी होते. चिबुड आकारानुसार २०० ते ३०० रुपये होते. निरफणस १५० ते ३०० रुपयांना विकले जात होते.

सोमवारी फलोत्पादन मंडळाच्या गाड्यांवर भेंडी ४५ रु., कोबी २६ रु., फ्लॉवर ३२ रु. प्रति नग, गाजर ४३ रु., वालपापडी ६० रु., मिरची ५४ रु., कांदा ५७ रु., बटाटा २७ रु. तर टोमॅटो २८ रुपये किलो होता.

हेही वाचा
सर्व पहा