समुद्रकिनाऱ्यावरील भटक्या कुत्र्यांचे होणार पुनर्वसन : मुख्यमंत्री डॉ. सावंत

जागतिक रेबीज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समुद्रकिनाऱ्यावरील भटक्या कुत्र्यांचे पुनर्वसन करण्याची घोषणा केली तसेच रेबीज निर्मूलनाचे गोवा मॉडेल देशभरात कौतुकास्पद ठरल्याचे सांगितले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
समुद्रकिनाऱ्यावरील भटक्या कुत्र्यांचे होणार पुनर्वसन : मुख्यमंत्री डॉ. सावंत

पणजी : मागील काही वर्षांत राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. पर्यटकांना भटकी कुत्रे चावण्याच्या घटना वाढत आहेत, यामुळे राज्यातील पर्यटनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. याचा विचार करून राज्य सरकार समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांचे अन्यत्र पुनर्वसन करणार आहे. याबाबत एका संस्थेसोबत बोलणी सुरू असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

सोमवारी जागतिक रेबीज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पशुसंवर्धन खात्याचे मंत्री नीलकंठ हळर्णकर, 'मिशन रेबीज'चे डॉ. मुरुगन अप्पू पिल्लई व अन्य अधिकारी उपस्थित होते.

रेबीज हा विषय समजून घेणे काळाची गरज

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील अनेक जण कुत्रे पाळतात अथवा भटक्या कुत्र्यांना जेवण देतात. कुत्र्यांनादेखील जगण्याचा अधिकार आहे, त्यामुळे त्यांना जेवण देणे ही गोष्ट चांगलीच आहे; मात्र त्याचबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्यादेखील स्वीकारल्या पाहिजेत. पाळीव अथवा जेवण घालणाऱ्या कुत्र्यांचे लसीकरण करणे, त्यांचे निर्बीजीकरण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. काही जण शौक म्हणून मोठी कुत्री पाळतात, अशा कुत्र्यांचा योग्य सांभाळ करणे आवश्यक आहे. या कुत्र्यांमुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, पूर्वी गोव्यात कुत्र्यांना गोळ्या झाडून मारले जायचे. आता तसे केले जात नाही. आता अशा कुत्र्यांचे लसीकरण आणि निर्बीजीकरण केले जाते. यासाठी 'मिशन रेबीज' ही संस्था मागील अनेक वर्षे काम करत आहे. सरकारी मदतीची अपेक्षा न ठेवता त्यांनी आपले काम सुरू केले होते, आता त्यांचे काम वाढले आहे. डॉ. मुरुगन यांनी संस्थेसाठी जागा मागितली होती, त्यानुसार पशुसंवर्धन खात्याने त्यांना उसगाव येथे जागा उपलब्ध करून दिली आहे. आता तिथे सर्व सुविधांयुक्त इमारत बांधणे ही संस्थेची जबाबदारी असून पुढील दोन वर्षांत हे काम पूर्ण होईल, अशी आमची अपेक्षा आहे.

गोव्याने २०२१ मध्ये 'रेबीज नियंत्रित राज्य' असा दर्जा मिळवला आहे. हा दर्जा कायम राखण्याचे काम सर्व सरकारी खात्यांसह सामान्य नागरिकांचेदेखील आहे. गोव्याच्या रेबीज निर्मूलन कार्यक्रमाचे देशभरात कौतुक झाले असून, अन्य राज्यांसाठी गोव्यातील रेबीज निर्मूलन कार्यक्रम आदर्श ठरला आहे. असाच कार्यक्रम राबवावा यासाठी आम्ही १४ राज्यांना पत्रे लिहिली आहेत. सर्व राज्यांनी गोव्याचे मॉडेल राबवण्याचे ठरवले असून, राजस्थान सरकारने सर्वप्रथम जयपूर शहरात गोव्यासारखा उपक्रम सुरूदेखील केला आहे.

तीन दिवसांचे बिल १.५ लाख

गोव्यात एक खाजगी पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू झाले आहे. तिथे माझ्या कुत्र्याच्या उपचारासाठी तीन दिवसांचे बिल १.५ लाख रुपये आले. भविष्यात राज्यात पशुवैद्यकीय डॉक्टरांना मोठी मागणी येणार आहे, याचा विचार करून सरकारने राज्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू केले आहे. याचा स्थानिकांना मोठा फायदा होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दोषींवर कारवाई होणार

कुडचडे येथील वाहनाच्या व्हायरल व्हिडिओप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले.


हेही वाचा
सर्व पहा