पणजी : ज्या राज्यात काँग्रेसचा पराभव झाला आहे, त्या राज्यात यापूर्वी त्यांनी ईव्हीएम (EVM) मशीनला दोष दिला आहे. आता काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी एसआयआर (SIR) प्रक्रियेसह निवडणूक आयोगावर हल्लाबोल सुरू केला आहे. चांगले कार्य करून जनतेचा विश्वास संपादन केल्यानंतरच निवडणुका जिंकणे शक्य होते, केवळ आरोप करून नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.
गोव्यातील जिल्हा पंचायत निवडणूक मतपत्रिकेच्या (बॅलेट पेपर) आधारे झाली होती. या निवडणुकीतही भाजपचा विजय झाला. मतपत्रिकेनुसार झालेल्या निवडणुकीतही काँग्रेसचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजप ईव्हीएमच्या आधारे नाही, तर आपल्या चांगल्या कार्याच्या बळावर निवडणुका जिंकत आला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
एसआयआर प्रक्रियेबाबत निवडणूक आयुक्तांमध्ये मतभेद होते, ही बाब आता उघड झाली आहे. याच अनुषंगाने पात्र असतानाही गोव्यातील ९७ मतदारांचा अंतिम मतदारयादीत समावेश करण्यात आला नसल्याची बाबही समोर आली. यामुळे एसआयआर प्रक्रियेच्या या घोळात गोवा केंद्रबिंदू बनला. आता काँग्रेससह इतर विरोधी पक्षांकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या मागणीसाठी काँग्रेसने दोन दिवसांपूर्वी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला होता.
हा हल्लाबोल सुरू असतानाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एसआयआर प्रक्रिया व निवडणूक आयोगाचे समर्थन केले आहे. एसआयआर प्रक्रिया योग्य असल्याचे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्ट केले आहे. यानंतर आता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आरोपांत कोणतेही तथ्य नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गोव्यातील काही जणांकडे पोर्तुगीज पासपोर्ट होते, तर काही जणांनी इतर राज्यांत नोंदणी केलेली आहे. यामुळे काही जणांची नावे मतदारयादीतून वगळावी लागली. नवीन नावनोंदणी करण्यासाठी 'फॉर्म ६' भरण्याची मुभा अजूनही कायम आहे. हेतूपुरस्सररीत्या कोणाचेही नाव वगळण्यात आलेले नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले.


