पणजी : पर्वरी येथील 'निओ मॅजेस्टिक' कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील संशयित सतीश शिंदे याने आपल्या अटकेला तसेच पाच दिवसांच्या पोलिस कोठडीच्या (रिमांड ऑर्डर) आदेशाला आव्हान देत गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी तक्रारदार श्रीनिवास नायक यांनी न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल करत संशयिताच्या याचिकेला जोरदार विरोध केला.
तक्रारदारांचे वकील ॲड. विभव आमोणकर यांनी या कायदेशीर घडामोडीबाबत माहिती देताना सांगितले की, संशयित सतीश शिंदे याने आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र, या याचिके संदर्भात कोणताही आदेश पारित झाल्यास त्याचा थेट परिणाम तक्रारदार आणि पीडित पक्षावर होणार आहे. त्यामुळे नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार कोणतीही सुनावणी किंवा आदेश देण्यापूर्वी मूळ तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेणे अत्यंत आवश्यक आहे, अशी भूमिका या हस्तक्षेप याचिकेद्वारे मांडण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने मुख्य याचिका आणि या हस्तक्षेप अर्जावरील पुढील सुनावणी बुधवारी घेण्याचे निश्चित केले आहे.
गोळीबार आणि क्राईम ब्रँचचा तपास
२८ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजून ४७ मिनिटांच्या सुमारास पर्वरी येथील 'निओ मॅजेस्टिक' कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या अचानक झालेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला असून तपासादरम्यान पोलिसांनी अत्यंत वेगाने हालचाली करत दोन शूटर्ससह एकूण सहा जणांना अटक केली होती. या अटकेच्या कारवाईदरम्यान संशयित सतीश शिंदे याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आले होते, जिथे त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली . मात्र, पोलिसांनी केलेली अटकेची प्रक्रिया आणि कायदेशीर बाबी चुकीच्या असल्याचा दावा करत शिंदे याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.


