बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये (Bengaluru) कृत्रिम बुद्धिमत्ता (AI एआय) आधारित ट्रॅफिक सुरक्षेच्या संदर्भातील एक रंजक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीला त्याच्या पाठीवर अडकवलेल्या गिटारमुळे (Guitar) ५०० रुपयांचे चलन जारी झाले.
सौविक दत्ता (Souvik Dutta) हे बंगळुरूमध्ये आपल्या पत्नीच्या स्कूटरवरून एकटेच प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांनी सुरक्षेची काळजी म्हणून स्वतः हेल्मेट घातले होते. त्यांनी पाठीवर गिटारची बॅग अडकवली होती. रस्त्यावरील एआय-सक्षम (AI-powered) ऑटोमॅटिक ट्रॅफिक कॅमेऱ्याने त्यांची छबी टिपली. परंतु या तंत्रज्ञानाने मोठा गोंधळ घालत पाठीवरील गिटार ओळखली नाही. त्यामुळे कॅमेऱ्याने त्या गिटारला ‘विनाहेल्मेट बसलेला सहप्रवासी’ (Pillion Rider without Helmet) असा समज करून घेतला.
चलन जारी, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
या चुकीच्या नोंदीमुळे सौविक दत्ता यांच्या पत्नीच्या नावे ५०० रुपयांचे ई-चलन जारी करण्यात आले. या प्रकारामुळे थक्क झालेल्या सौविक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (X) एआय कॅमेऱ्याने काढलेला फोटो आणि चलनाची पावती शेअर करत बंगळुरू ट्रॅफिक पोलिसांना टॅग केले. त्यांनी एआय-आधारित ट्रॅफिक सिस्टीमच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे चलन रद्द करण्याची मागणी केली. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल झाली आणि युजर्सनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या.
पोलिसांकडून तांत्रिक चूक मान्य
हा प्रकार समोर आल्यानंतर बंगळुरू ट्रॅफिक पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली. पोलिसांनी सौविक दत्ता यांना ई-मेलद्वारे किंवा संपर्क साधून हे चलन रद्द करण्यासाठी अर्ज करण्यास सांगितले. तसेच एआय यंत्रणांमध्ये कधी कधी अशा तांत्रिक चुका होऊ शकतात आणि पडताळणीनंतर अशा चुका सुधारल्या जातात, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. नंतर हे चुकीचे चलन रद्द करण्यात आले.


