पणजी : गोव्यातील एका मद्यवितरण कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा (सीईओ) व्हॉट्सअॅप डीपी वापरून लेखापालाची दिशाभूल करत कंपनीला २ कोटींचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणातील सुमारे ८४ लाख रुपये गोठविण्यात सायबर गुन्हे विभागाला यश आले आहे. दरम्यान, प्रकरणातील दोन मुख्य संशयित विदेशात पसार झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
या प्रकरणी सायबर गुन्हे विभागाने ८ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला. गोव्यातील एका प्रसिद्ध मद्यवितरण कंपनीच्या लेखापालाला संशयितांकडून ई-मेल पाठविण्यात आला होता. ई-मेल उघडल्यानंतर त्यांचा लॅपटॉप हॅक करण्यात आला. या लॅपटॉपला लेखापालाचा व्हॉट्सअॅप कनेक्ट असल्याचा फायदा संशयितांनी घेतला. त्यानंतर ७८९३७१२००४ या क्रमांकावरून व्हॉट्सअॅप संदेश पाठविण्यात आला. या खात्याच्या प्रोफाइलवर कंपनीच्या सीईओचा फोटो होता. त्यामुळे संदेश सीईओकडूनच आल्याचे समजून लेखापालाने संशयिताच्या सूचनेनुसार २ कोटी रुपये आरटीजीएसद्वारे इंडसइंड बँकेच्या २५७७९८५०७०७० या खात्यात हस्तांतरित केले.
कंपनीच्या सीईओ आणि इतर अधिकाऱ्यांना खात्यातून एवढी मोठी रक्कम हस्तांतरित झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी लेखापालाकडे चौकशी केली. त्यावेळी फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली. सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक सुजय कोरगावकर यांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२) व ३(५) तसेच माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६-ड अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
दरम्यान, सायबर गुन्हे विभागाने तातडीने केलेल्या कारवाईत फसवणुकीतील सुमारे ८४ लाख रुपये गोठविण्यात यश मिळवले आहे. उर्वरित रकमेचा माग काढण्यासाठी तसेच विदेशात पसार झालेल्या संशयितांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
पुण्यातील दोघांना अटक, दोघांचा शोध सुरू
तपासादरम्यान फसवणुकीची रक्कम पुण्यातील एका बँक खात्यात जमा झाल्याचे समोर आले. त्यानंतर सायबर विभागाचे पथक पुण्यात रवाना करण्यात आले. तेथे दीपक उद्धव मस्के आणि श्याम संदीप कासार (रा. दोघेही पुणे, महाराष्ट्र) यांना अटक करण्यात आली. दोघांची चौकशी केल्यानंतर या फसवणुकीत आणखी २ साथीदार सहभागी असल्याचे समोर आले. हे दोन्ही संशयित दुबईला पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, त्यांचा शोध सुरू आहे.


