बेळगाव : चोर्ला घाटातील डेल्टा हॉटेलजवळ खडीवाहू ट्रकला बेळगाव नोंदणीकृत कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कारमधील अन्य प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खडीवाहू ट्रक (जीए ०४ टी ८१९२) चोर्ला घाटातून जात असताना डेल्टा हॉटेलजवळ कारने (केए २२ एम ५२२६) त्याला जोरदार धडक झाली. धडकेनंतर कारचा चालक वाहनातच अडकून पडला. अपघाताची माहिती मिळताच खानापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, कारमध्ये अडकलेल्या मृत चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, एका जखमीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. या अपघाताचा पुढील तपास खानापूर पोलीस करीत आहेत.


