मारहाणप्रकरणी संशयिताला आठ महिन्यांनंतर जामीन

मडगाव सत्र न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा बाँड, विविध अटी लागू

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
30th September, 11:59 pm
मारहाणप्रकरणी संशयिताला आठ महिन्यांनंतर जामीन

मडगाव : घरात घुसून मारहाण केल्याच्या आरोपाखाली आठ महिन्यांहून अधिक काळ न्यायालयीन कोठडीत असलेल्या विली सांताना फर्नांडिस याला मडगाव सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. सत्र न्यायाधीश शर्मिला पाटील यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.
या प्रकरणातील तक्रारदार महिला, तिची आई आणि संशयित हे नातेवाईक आहेत. तक्रारदार महिलेने न्यायालयात साक्ष देताना पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीला पाठिंबा दिला नाही. तसेच दोघींनी आपापसातील वाद सामोपचाराने मिटविल्याचे सांगत, कोणत्याही दबावाशिवाय विलीच्या जामिनाला हरकत नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, सरकारी वकिलांनी जामीन अर्जास विरोध केला. विलीविरुद्ध यापूर्वीही तक्रारदाराच्या घरात घुसून तिच्यावर हल्ला केल्याचा गुन्हा नोंद असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. जामीन मिळाल्यास तो पुन्हा तक्रारदार किंवा तिच्या मुलांवर हल्ला करू शकतो, तसेच साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला.
जामिनासाठी कडक अटी
तक्रारदार पक्षाने वाद मिटल्याचे स्पष्ट केल्याने न्यायालयाने विलीचा जामीन अर्ज मंजूर केला. त्याला २५ हजार रुपयांचा वैयक्तिक बाँड आणि तेवढ्याच रकमेचा एक हमीदार सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तक्रारदार किंवा साक्षीदारांना धमकी देणे, दबाव आणणे अथवा पुराव्यांशी छेडछाड करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर पासपोर्ट न्यायालयात जमा करून पूर्वपरवानगीशिवाय गोवा किंवा देशाबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.            

हेही वाचा
सर्व पहा