वास्को : मुलाला जर्मनीत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून दाबोळी येथील महिलेची २.५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
याप्रकरणी पर्पेटुआ सोकोरो एस्पेरांका यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ३१ जुलै रोजी चिखली येथे हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी कुठ्ठाळी येथील सेड्रिक टेल्स आणि ज्युलियस टेल्स तसेच चिंचणी येथील राल्फ अँथनी मेनेझिस यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, सेड्रिक आणि ज्युलियस यांनी तक्रारदार महिलेची मेनेझिस याच्याशी ओळख करून दिली. मेनेझिस याने स्वतःला भरती एजंट असल्याचे भासवून तिच्या मुलाला जर्मनीत नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्याच्या आश्वासनावर विश्वास ठेवून महिलेने आरटीजीएसद्वारे २.५ लाख रुपये दिले.
रक्कम मिळाल्यानंतर संशयितांनी तिच्या फोनला प्रतिसाद देणे बंद केले. तसेच नोकरीबाबत टाळाटाळ करणारी व संदिग्ध उत्तरे दिली. मुलाला आश्वासन दिलेली नोकरी मिळाली नाही आणि दिलेली रक्कमही परत करण्यात आली नाही, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
वास्को पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास वास्को पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निखिल देसाई करीत असून, पोलीस निरीक्षक वैभव नाईक यांच्या देखरेखीखाली आणि मुरगावचे उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.


