वास्को : घरी परतण्यास बराच उशीर झाल्याने व आईचे फोन येत असल्याने दुचाकीवरून घरांकडे निघालेले मांगोरहिल येथील श्रीशैल तलवार (२८) व बायणा येथील सुवर्णा कोप्पर (२२) हे घरी पोहचण्यापूर्वीच अपघातात सापडल्याने मृत्युमुखी पडले. श्रीशैल चालवित असलेल्या दुचाकीची बायणा उड्डाणपुलाच्या कठड्याला जोरदार धडक बसल्यावर ते दोघे उसळून उड्डाणपुलावरुन २० ते २५ फूट खाली असलेल्या रस्त्यावर कोसळले. श्रीशैल याची मोटारसायकल उड्डाणपुलावर पडली होती आणि ते दोघे पुलाखालील रस्त्यावर निपचित पडले होते.
सदर घटना गुरुवारी रात्री घडली. दुचाकीवरून श्रीशैल व सुवर्णा बायणाकडे येत असताना बायणा उड्डाणपुलाच्या तीव्र वळणावर श्रीशैलचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली. त्यामुळे ते दोघेही दुचाकीवरून उसळून उड्डाण पुलाखालील रस्त्यावर पडले. खाली पडताना सुवर्णा हिची किंकाळी ऐकू आल्याने आसपासचे लोक धावून त्या ठिकाणी आले. उंचीवरून खाली आदळल्याने सुवर्णाचा जागीच मृत्यू झाला. श्रीशैलच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. त्याला उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. अपघात एवढा भयानक होता की, काहीजणांनी तेथील दृश्य न पाहता तेथून दूर जाणे पसंत केले.
श्रीशैल हा मांगोरहिल येथील गुरुद्वारानजीकच्या एका गल्लीत आपल्या पालकांसह राहत होता. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून तो आपल्या आईवडिल, भाऊ यांच्यासह ड्रायव्हरहिल येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. श्रीशैल हा डान्सर म्हणून मांगोरहिल भागात प्रसिद्ध होता. तर त्याचा भाऊ डिजे म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीशैल याला चार- पाच महिन्यांपूर्वी गोवा शिपयार्डमध्ये कंत्राटी पद्धतीवर नोकरी लागली होती. त्यामुळे त्याचे पालक व तो खूष होता. गुरुवारी तो बाहेर जाऊन येतो, असे आईला सांगून घराबाहेर पडला होता. बराच वेळ तो घरी न परतल्याने त्याच्या आईला काळजी वाटत होती. त्यामुळे त्याच्या आईने फोन करून लवकर घरी ये, असे सांगितले. परंतु तो घरी पोहचला नाही.
सुवर्णा ही बायणा कलीमट्टी चाळीत राहते. तिचे आजोबा एमपीटीमध्ये कामाला होते. वडिलही मुरगाव बंदरातील वेस्टर्न इंडिया शिपिंगमध्ये कामाला होते. त्यांचे बारा वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे तिच्या आईने सुवर्णा व तिच्या भावाला सांभाळले होते. सुवर्णा हिने हॉटेल मॅनेजमेंट कोर्स केल्याने ती काही दिवस पुण्यामध्ये कामाला होती. महिन्यापूर्वी ती वास्कोला आल्यावर ती एका हॉटेलमध्ये कामाला लागली होती. गुरुवारी ती श्रीशैलसह दुचाकीने बायणा येथे येत असताना अपघातात सापडली.
सुवर्णा, श्रीशैलवर अंत्यसंस्कार
अपघातप्रकरणी वास्को पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पाठविले. शवचिकित्सेनंतर श्रीशैल व सुवर्णा यांचे मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. श्रीशैल याच्यावर खारीवाडा येथील हिंदू स्मशानभूमीत तर सुवर्णा हिच्यावर बोगदा येथील हिंदू स्मशानभूमीत शुक्रवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.


