कौटुंबिक वादातून पत्नीवर प्राणघातक हल्ला; पतीला अटक

एकतानगर म्हापसा येथील घटना

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
03rd October, 11:43 pm
कौटुंबिक वादातून पत्नीवर प्राणघातक हल्ला; पतीला अटक

म्हापसा : एकतानगर म्हापसा येथील गृहनिर्माण वसाहतीमध्ये कौटुंबिक वादातून पतीने आपल्या ३० वर्षीय पत्नीवर लोखंडी सळीने प्राणघातक हल्ला केला. गंभीर जखमी महिलेवर गोमेकॉत उपचार सुरू असून संशयित आरोपी पती दादापीर मेदलेरी (३२) याला म्हापसा पोलिसांनी अटक केली आहे.

ही घटना शनिवार, ३ रोजी सकाळी ७.३० वा. सुमारास घडली. याप्रकरणी पीडित महिलेचे भाऊ रज्जाबली दारुगर (रा. ग्रँड मरड, म्हापसा) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून संशयित आरोपी दादापीर मेदलेरी व पत्नी फातिमा बी (३०) यांच्यामध्ये कौटुंबिक वाद सुरू होता. या वादातून संशयिताने पत्नी फातिमा हिला अश्लील शिवीगाळ करत लोखंडी सळीने बेदम मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

या हल्ल्यात फातिमा बी यांच्या डोक्याला आणि डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. तिला म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. नंतर बांबोळी येथील गोवा मे​डिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आले. तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी संशयित आरोपी दादापीर मेदलेरी याला पकडून ताब्यात घेतले. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२, ११८ (२) आणि ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.

म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयाने संशयिताला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमेय नाईक हे करीत आहेत.