बागा बीचवर पर्यटकांना टाउट्सपासून सावध करणाऱ्या पत्रकारावर हल्ला; कळंगूट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

बागा बीचवर पर्यटकांची फसवणूक करणाऱ्या दलालाला रोखण्याचा प्रयत्न करणारे 'दैनिक भांगरभूंय'चे पत्रकार समीप नार्वेकर यांच्यावर दलालाने हल्ला केला. याप्रकरणी कळंगूट पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.पर्यटन मंत्री खंवटे यांनी या प्रकणाची दखल घेतली असून संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
बागा बीचवर पर्यटकांना टाउट्सपासून सावध करणाऱ्या पत्रकारावर हल्ला; कळंगूट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पणजी : :गोव्यातील प्रसिद्ध बागा बीच परिसरात फसवी ऑफर्स देत फसवणूक करणाऱ्या टाउट्सपासून पर्यटकांना सतर्क करण्याचा प्रयत्न करणारे दैनिक भांगरभूंयचे पत्रकार समीप नार्वेकर यांच्यावर संबंधित टाउट्सने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी त्यांनी शनिवारी, ३ ऑक्टोबर रोजी कळंगूट पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे उत्तर गोव्यातील किनारपट्टीवर टाउट्सचे वाढते प्रमाण आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

 


मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी, २ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ११.५४ च्या सुमारास ही घटना बागा बीच येथील पार्किंग परिसरात घडली. लॉन्ग वीकेंडच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची होणारी गर्दी आणि किनारपट्टी भागातील स्थितीची पाहणी करून वृत्त संकलित करण्यासाठी समीप नार्वेकर बागा बीच परिसरात गेले होते. ते एका मित्राच्या रेस्टॉरंटजवळ उभे असताना, तेथे एका कारमध्ये बसलेल्या पर्यटकांना एक दलाल जाळ्यात ओढण्याचा आणि त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे नार्वेकर यांच्या निदर्शनास आले.  

एक पत्रकार आणि सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून नार्वेकर यांनी तात्काळ मोबाईल काढून या संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण सुरू केले. तसेच, गाडीत बसलेल्या पर्यटकांना "हा दलाल असून तो तुमची फसवणूक करेल, त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका," असा इशारा देऊन सावध करण्याचा प्रयत्न केला. नार्वेकर यांनी पर्यटकांना सतर्क केल्याचे पाहताच तो दलाल प्रचंड संतापला. त्याने थेट नार्वेकर यांच्या दिशेने येत त्यांना रोखून पाहिले आणि अचानक नार्वेकर यांच्या जबड्यावर हाताने जोरात मारहाण करून त्यांना धक्का दिला.  

 हा अचानक झालेला हल्ला आणि निर्माण झालेली गोंधळसम स्थिती पाहून परिसरातील उपाहारगृह कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून नार्वेकर यांना बाजूला केले. पकडले जाण्याच्या भीतीने त्या दलालाने जवळच असलेल्या उपाहारगृहात धाव घेतली आणि मागील दरवाजातून पळ काढला. या घटनेनंतर नार्वेकर यांनी कळंगूट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण पुराव्यादाखल सादर केले आणि रीतसर तक्रार दाखल केली. गोव्याच्या पर्यटन क्षेत्राची बदनामी करणाऱ्या आणि पर्यटकांची लूट करणाऱ्या अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दलालांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी नार्वेकर यांनी आपल्या तक्रार अर्जात केली आहे. या तक्रारीची दखल घेत कळंगूट पोलिसांनी (इनवर्ड क्र. ६७०५) गुन्हा नोंदवून घेतला असून, फरार दलालाचा शोध सुरू केला आहे. 

पत्रकार समीप नार्वेकरवरील भ्याड हल्ल्याचा निषेध : मंत्री खंवटे

दरम्यान पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी टाउट्सपासून पर्यटकांना सावध करण्यासाठी पुढे आलेल्या पत्रकार समीप नार्वेकर यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध केला. या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. एक 'सच्चा गोंयकार' म्हणून आपले कर्तव्य बजावणाऱ्या समीप नार्वेकर यांच्या भूमिकेचे पर्यटन मंत्री म्हणून मी मनापासून कौतुक करतो. गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला लागलेली कीड समूळ नष्ट करण्यासाठी आपल्याला अशाच जागरूक आणि सक्रिय नागरिकांची गरज आहे असे ते म्हणाले. 


हेही वाचा
सर्व पहा