गोव्यातील काजू उत्पादन वाढीसाठी पुत्तूरच्या 'जर्मप्लाझम'वर संशोधनाची गरज

डॉ. ए. के. नाईक : आयसीएआर संशोधन केंद्रात शेतकऱ्यांशी संवाद


13 mins ago
गोव्यातील काजू उत्पादन वाढीसाठी पुत्तूरच्या 'जर्मप्लाझम'वर संशोधनाची गरज

शेतकऱ्यांशी संवाद साधताना आयसीएआरचे उपमहासंचालक डॉ. ए. के. नायक आणि आयसीएआर-गोवाचे संचालक डॉ. प्रवीण कुमार. (समीप नार्वेकर)
गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
गोव्याचा काजू आणि काजूपासून तयार होणारी फेणी जगभर प्रसिद्ध आहे. मात्र राज्यातील काजूची उत्पादन क्षमता अपेक्षेपेक्षा कमी आहे. काजू बागायतीचे अयोग्य व्यवस्थापन, झाडांची शास्त्रीय पद्धतीने छाटणी न करणे, आंतरमशागतीचा अभाव, तसेच जुन्या झाडांच्या पुनरुज्जीवनाकडे होणारे दुर्लक्ष ही कमी उत्पादनाची मुख्य कारणे आहेत, असे आयसीएआरचे उपमहासंचालक डॉ. ए. के. नायक यांनी सांगितले.
जुने गोवा येथील आयसीएआर संशोधन केंद्रात आयोजित शेतकऱ्यांच्या चर्चासत्रात डॉ. नायक बोलत होते. या सत्रात राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी आपले प्रश्न डॉ. नायक यांच्यासमोर मांडले. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान या सत्रात सहभागी होणार होते; परंतु त्यांच्या वेळापत्रकात ऐनवेळी बदल झाल्यामुळे त्यांनी हा दौरा रद्द केला. एका शेतकऱ्याने काजू बागायतींच्या पुनरुज्जीवनासाठी गोव्यात स्वतंत्र ‘काजू संशोधन संस्था’ स्थापन करण्याची मागणी केली. यावर डॉ. नायक म्हणाले की, कर्नाटकातील पुत्तूर येथील ‘राष्ट्रीय काजू संशोधन केंद्रा’त देशातील विविध काजूंच्या जाती आणि वाणांचा जर्मप्लाझम जतन करून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गोव्यात स्वतंत्र काजू संशोधन केंद्र स्थापन करण्याऐवजी पुत्तूर येथे जतन केलेल्या जर्मप्लाझममधून गोव्याच्या हवामानाला आणि मातीला योग्य असणाऱ्या वाणांची निवड करून त्यांची गोव्यात चाचणी घेणे अधिक फायदेशीर ठरेल.
पुत्तूर संशोधन केंद्राने आतापर्यंत काजूच्या ६ नवीन प्रजाती विकसित केल्या आहेत. या प्रजातींची उत्पादनक्षमता गोव्यात सध्या लागवड केल्या जाणाऱ्या काजू प्रजातींपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे पुत्तूरहून योग्य काजू प्रजातींचा जर्मप्लाझम गोव्यात आणून त्यांची प्रायोगिक तत्त्वावर लागवड व चाचणी केल्यास, गोव्याच्या हवामानाला आणि मातीला पूरक असणारी प्रजाती निश्चित करणे सोपे होईल. असे केल्यास गोव्यातील काजूची उत्पादनक्षमता वाढवण्याची मोठी संधी उपलब्ध होऊ शकते, असेही डॉ. नायक यांनी स्पष्ट केले.
गोव्यात काजूबागांची उत्पादन क्षमता कमी असण्याची कारणे
गोव्याची तांबडी जांभी माती आम्लयुक्त स्वरूपाची आहे. अशा मातीत काजूची लागवड शक्य असली, तरी योग्य व्यवस्थापन न केल्यास उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. गोव्यातील अनेक जुन्या काजू बागांमधील झाडे काढून नवीन लागवड केली जात नाही. झाडांची शास्त्रीय पद्धतीने छाटणी होत नाही आणि आंतरमशागतही योग्य रीतीने केली जात नाही, ज्यामुळे काजू बागांची उत्पादनक्षमता कमी राहते, अशी कारणे डॉ. नायक यांनी दिली.
पुत्तूर येथे देशातील विविध काजू वाणांचा मोठा जर्मप्लाझम संग्रह आहे. गोव्याच्या स्थानिक जर्मप्लाझमची या संग्रहातील प्रजातींसोबत तपासणी (स्क्रीनिंग) आणि मूल्यमापन करून गोव्याच्या परिस्थितीला सर्वांत योग्य असणारी प्रजाती निवडण्याची गरज आहे.
कोट
_ डॉ. ए. के. नायक, उपमहासंचालक, आयसीएआर

हेही वाचा
सर्व पहा