गांधीजी, शास्त्रीजींच्या स्वप्नातील 'विकसित-नशामुक्त भारत' घडवणे हीच खरी श्रद्धांजली: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त जुने गोवे येथे आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विकसित भारत २०४७ आणि नशामुक्त भारत निर्माण करण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्र येऊन सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
गांधीजी, शास्त्रीजींच्या स्वप्नातील 'विकसित-नशामुक्त भारत' घडवणे हीच खरी श्रद्धांजली: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी: महात्मा गांधी जयंती तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त जूने गोवे येथे एका भव्य राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून 'विकसित भारत २०४७' आणि 'नशामुक्त भारत' निर्माण करण्याचे ठाम आवाहन केले.



येथे पार पडलेल्या भव्य सोहळ्यात राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक आणि मेधा पर्वतकर यांची उपस्थिती लाभली. तसेच गोव्याचे मुख्य सचिव व्ही. कांडावेलू, माजी मंत्री निर्मला सावंत, स्वातंत्र्यसैनिकांचे पुढारी दत्ता देसाई यांच्यासह विविध पंच, सरपंच, वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी महात्मा गांधीजींच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत स्वच्छता, स्वदेशी आणि त्यांनी दिलेला स्वावलंबनाचा मूलमंत्र अधोरेखित केला. गांधीजींनी सत्य, अहिंसा, स्वदेशी, स्वभाषा आणि स्वसंस्कृतीसोबतच स्वच्छतेला आयुष्यात सर्वोच्च स्थान दिले होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने जनआंदोलन उभे केले, ज्याच्या बळावर १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. गांधीजी हे देशातील पहिले असे नेतृत्व होते ज्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहीम राबवली आणि संपूर्ण देशाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास आणि शेतकऱ्यांची प्रगती हेच गांधीजींचे खरे स्वप्न होते, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

गांधीजींच्या या स्वप्नांना प्रत्यक्ष आकार देण्याचे काम गेल्या काही वर्षांत वेगाने सुरू असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा गौरव केला. २०१४ सालापासून देशात राबवल्या जाणाऱ्या 'स्वच्छता ही सेवा' या अभियानाने स्वच्छतेला एका व्यापक लोकचळवळीचे स्वरूप दिले आहे. या अभियानाचा अत्यंत सकारात्मक परिणाम आजच्या लहान मुलांवर आणि विद्यार्थ्यांवर दिसून येत आहे. महात्मा गांधींचे 'आत्मनिर्भर भारत' हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 'मेक इन इंडिया' आणि 'व्होकल फॉर लोकल' हे उपक्रम अत्यंत प्रभावी ठरले आहेत. आज भारताने उत्पादन क्षेत्रापासून थेट संरक्षण क्षेत्रापर्यंत अभूतपूर्व प्रगती करत स्वबळावर उभे राहण्याचे सामर्थ्य मिळवले आहे, असे ते म्हणाले.  राष्ट्राची प्रगती केवळ भौतिक विकासात नसून नैतिक आणि सामाजिक मूल्यांच्या जपणुकीतही सामावलेली आहे, हा विचार राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या जीवनकार्यातून सिद्ध केला. याच महान नेत्यांच्या विचारांचा वारसा पुढे न्यावा असे मुख्यमंत्री म्हणाले.

देशापुढील सध्याच्या आव्हानांवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी नशामुक्त आणि टीबीमुक्त भारताचा संकल्प मांडला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाला अनेक संकटांना तोंड द्यावे लागले होते, परंतु आज भारत देश दहशतवाद आणि नक्षलवादाच्या छायेतून यशस्वीरीत्या बाहेर पडत आहे. आता देशाला नशामुक्त आणि टीबीमुक्त करण्याचे नवे ध्येय गाठायचे आहे. ही मोहीम केवळ सरकारी पातळीवर मर्यादित राहून पूर्ण होऊ शकत नाही; यासाठी शिक्षक, तरुण, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी आणि प्रत्येक नागरिकाचा प्रत्यक्ष सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. नशामुक्त भारताची ही चळवळ प्रत्येक घरात पोहोचवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मृतीस अभिवादन करताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ऐतिहासिक 'जय जवान, जय किसान' या घोषणेची आठवण करून दिली. सीमेवर देशाचे रक्षण करणारा जवान आणि देशातील जनतेचे पोट भरणारा शेतकरी हे दोन्ही घटक राष्ट्रउभारणीत समान महत्त्वाचे आहेत. आज देशाचा कारभार युवाशक्ती, नारीशक्ती, किसानशक्ती आणि गरीब कल्याण या चार भक्कम स्तंभांवर आधारलेला आहे.

अखेर, स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण होताना म्हणजेच २०४७ सालापर्यंत विकसित भारत आणि विकसित गोवा साकारण्याचे ध्येय गाठण्यासाठी पायाभूत सुविधा आणि मानवी संसाधनांचा वेगाने विकास केला जात आहे. हे ध्येय गाठण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे आणि विशेषतः तरुणांचे योगदान मोलाचे ठरेल. गांधीजी आणि शास्त्रीजींच्या विचारांचा अंगीकार करून राष्ट्रउभारणीत सहभाग नोंदवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.


हेही वाचा
सर्व पहा