वास्को : बायणा येथील आरटीओ कार्यालयाजवळील उड्डाणपुलावर दुचाकी संरक्षक कठड्याला धडकल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात युवक आणि युवतीचा मृत्यू झाला. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानंतर दोघेही उड्डाणपुलाखालील रस्त्यावर कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या अपघातात मुंगुल, वास्को येथील श्रीशल तलवार (२९) याचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेल्या युवतीची ओळख सुवर्णा अशी पटली असून, तिचे पूर्ण नाव अद्याप समजू शकलेले नाही. तीही मुंगुल येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर दोघांनाही तातडीने चिखली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. दरम्यान, अपघाताचा अधिक तपास सुरू आहे.
या दुर्घटनेनंतर बायणा उड्डाणपुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उड्डाणपुलाच्या परिसरात यापूर्वीही अशाच प्रकारचे गंभीर अपघात झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे पुलावरील वाहतूक सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.


