मडगाव : मंगळुरू येथील 'विश्व कोंकणी केंद्रा'च्या 'कोकणी भाषा आणि संस्कृती प्रतिष्ठान'चे अध्यक्ष सी.ए. नंदगोपाल शेणॉय यांची ३४ व्या अखिल भारतीय कोकणी अधिवेशनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय कोंकणी परिषदेच्या वतीने आयोजित केले जाणारे हे दोन दिवसीय अधिवेशन येत्या १४ आणि १५ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील पुणे येथे पार पडणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे पद भूषवणारे फा. मोउजीञु द आताईद यांच्याकडून शेणॉय हे आगामी अधिवेशनासाठी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील.
नंदगोपाल शेणॉय हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असून १९८९ पासून अप्रत्यक्ष करांच्या (Indirect Taxes) क्षेत्रात कार्यरत आहेत. व्यावसायिक कामगिरीसोबतच त्यांनी कोंकणी भाषा, संस्कृती आणि समाजाच्या शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण आणि सातत्यपूर्ण योगदान दिले आहे. २०२१ पासून ते विश्व कोकणी केंद्राच्या कोकणी भाषा आणि संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळत आहेत.
विश्व कोकणी केंद्राच्या माध्यमातून त्यांनी डिजिटल युगात कोंकणी भाषेचा प्रसार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी 'विश्व कोकणी' यूट्यूब चॅनेलवर १७०० हून अधिक व्हिडिओंची निर्मिती करून कोंकणी भाषेतील डिजिटल आशय निर्मितीला मोठी गती दिली. याशिवाय तरुण पिढीच्या सक्षमीकरणासाठी 'विद्याकल्पक' शिष्यवृत्ती योजना आणि 'क्षितिज' हा सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण उपक्रम यशस्वीपणे राबवून युवा सक्षमीकरणाचे नेतृत्व केले आहे.
देशभरात कोकणी भाषेचे संवर्धन आणि विकास करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय कोंकणी परिषदेने नंदगोपाल शेणॉय यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्यांच्या अभ्यासू आणि कार्यक्षम नेतृत्वाखाली कोंकणी भाषा आणि संस्कृतीच्या चळवळीला अधिक गती व नवी दिशा मिळेल, असा विश्वास परिषदेने व्यक्त केला आहे.


