बायणा दरोडा प्रकरण : दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने फेटाळला संशयिताचा जामीन

बायणा-वास्को येथे नोव्हेंबर २०२५ मध्ये घरात घुसून कुटुंबाला मारहाण करत ३५ लाख रुपयांची लुटमार केल्याप्रकरणी ओडिशा येथील संशयित साशा उर्फ मार्कंडेय मलिक याचा जामीन अर्ज दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने फेटाळला.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
16 mins ago
बायणा दरोडा प्रकरण : दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने फेटाळला संशयिताचा जामीन

मडगाव : मुरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बायणा-वास्को येथे नोव्हेंबर २०२५ मध्ये मध्यरात्री घरात घुसून कुटुंबातील सदस्यांना बांधून ठेवत मारहाण करून ३५ लाख रुपयांचा ऐवज लुटल्याप्रकरणी संशयित आरोपी साशा उर्फ मार्कंडेय मलिक (रा. ओडिशा) याचा जामीन अर्ज आणि दोषमुक्ततेचा अर्ज दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुधीर शिरगावकर यांच्या न्यायालयात याप्रकरणी सुनावणी पार पडली. याप्रकरणी मुरगाव पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), १०९, ३५१(३), १२६(२), ३१०(२), ३(५) तसेच गोवा बाल कायदा २००३ मधील कलम ८ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस आरोपपत्रानुसार, एकूण सात संशयितांनी पूर्वनियोजित कट रचून घराच्या स्वयंपाकघराची खिडकी तोडून आत प्रवेश केला होता. त्यानंतर तक्रारदार महिला हर्षा नायक, तिचे पती सागर नायक आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीला कपड्यांनी बांधून ठेवण्यात आले. सागर नायक यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला, तर महिला व अल्पवयीन मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. संशयितांनी जीवे मारण्याची धमकी देत घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल लुटल्याचा गंभीर आरोप आहे.

सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी संशयिताच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध दर्शवला. गुन्ह्याचे गांभीर्य, मध्यरात्रीचे कृत्य आणि अल्पवयीन मुलीसह कुटुंबावर झालेला प्राणघातक हल्ला याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली. संशयिताला सिद्ध झालेल्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते आणि तो मूळचा ओडिशाचा रहिवासी असून गोव्यात त्याचा कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता नाही, त्यामुळे जामीन मिळाल्यास तो फरार होण्याची दाट शक्यता असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले.

तसेच संशयिताकडून मुद्देमाल जप्त झालेला नसला, तरी सर्व संशयितांनी एकत्रितपणे कट रचून गुन्हा केल्याचा आरोप असल्याने या टप्प्यावर त्याची भूमिका इतर संशयितांपासून वेगळी करता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि तपासातील तथ्ये विचारात घेत न्यायालयाने साशा उर्फ मार्कंडेय मलिक याचा जामीन अर्ज तसेच दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळून लावला.



हेही वाचा
सर्व पहा