राज्याच्या जीएसटी संकलनात ७ टक्क्यांनी घट

गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्याच्या यंदाच्या सप्टेंबर महिन्याच्या जीएसटी संकलनात ७ टक्क्यांनी घट झाली आहे. यंदा सप्टेंबर महिन्यात जीएसटीद्वारे एकूण ४९४ कोटी रुपये महसूल गोळा करण्यात आला आहे. गतवर्षीच्या सप्टेंबर महिन्यात जीएसटी संकलन ५३३ कोटी रुपये होते. केंद्रीय अर्थ खात्याने ही माहिती जारी केली आहे. सप्टेंबर महिन्यात केंद्रीय वाटा मिळण्यापूर्वी गोव्यातून २०० कोटी रुपये कर जमा झाले आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये ही रक्कम १९३ कोटी रुपये होती. यंदा या रकमेत ४ टक्क्यांची वाढ झाली आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
just now
राज्याच्या जीएसटी संकलनात ७ टक्क्यांनी घट

पणजी : गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्याच्या यंदाच्या सप्टेंबर महिन्याच्या जीएसटी संकलनात ७ टक्क्यांनी घट झाली आहे. यंदा सप्टेंबर महिन्यात जीएसटीद्वारे एकूण ४९४ कोटी रुपये महसूल गोळा करण्यात आला आहे. गतवर्षीच्या सप्टेंबर महिन्यात जीएसटी संकलन ५३३ कोटी रुपये होते. केंद्रीय अर्थ खात्याने ही माहिती जारी केली आहे.

सप्टेंबर महिन्यात केंद्रीय वाटा मिळण्यापूर्वी गोव्यातून २०० कोटी रुपये कर जमा झाले आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये ही रक्कम १९३ कोटी रुपये होती. यंदा या रकमेत ४ टक्क्यांची वाढ झाली आहे. 

चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान केंद्र सरकारने गोव्यातून १,३४४ कोटी रुपये कर संकलित केला आहे. यामध्ये इंटिग्रेटेड जीएसटी (आयजीएसटी) द्वारे जमा केलेल्या ३९९ कोटी, सीजीएसटीद्वारे ४२६ कोटी तर एसजीएसटीद्वारे जमा करण्यात आलेल्या ५१९ कोटी रुपयांचा समावेश आहे.

संपूर्ण देशाचा विचार करता सप्टेंबर महिन्यात जीएसटी संकलन २.०४ लाख कोटी रुपये झाले. देशाचे जीएसटी संकलन मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापेक्षा १४.७ टक्क्यांनी जास्त आहे. सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातून सर्वाधिक २९,९८६ कोटी जीएसटी संकलन झाले. 

कर्नाटकमधून १३,८८४ तर गुजरात मधून १२,२२२ कोटी रुपये जीएसटी संकलन झाले. सप्टेंबर मध्ये मिझोरम  मधून सर्वात कमी ३८ कोटी रुपये जीएसटी संकलन झाले. केंद्र सरकारने यापूर्वीच राज्य सरकारांना कर हस्तांतरणाचा १.०९ लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त हप्ता जारी केला होता.

यामध्ये गोव्याला ३९८ कोटी रुपये निधी मिळाला होता. राज्यांच्या भांडवली आणि विकासात्मक खर्चाला गती देण्यासाठी त्याची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी हा निधी जारी करण्यात आला होता.

हेही वाचा
सर्व पहा