आकाशात हजारो फूटांवर वेगाने उडणाऱ्या विमानात प्रवाशांची सुरक्षा ही केवळ तांत्रिक कौशल्यांवर अवलंबून नसते, तर त्यासाठी तीव्र संयम, समयसूचकता आणि पोलादी आत्मविश्वासाची गरज असते. नुकत्याच घडलेल्या एका अत्यंत संवेदनशील घटनेत हीच तत्परता दाखवत फ्लाईदुबई एयरलाइन्सचे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित माछर यांनी जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली आहे. दुबई ते तेल अवीव दरम्यान उड्डाण करणाऱ्या 'FZ1073' या विमानामध्ये कॉकपिटच्या आत निर्माण झालेल्या अत्यंत गंभीर संकटावर मात करत त्यांनी सुमारे १८० प्रवाशांचा जीव वाचवला आहे.
कॅप्टन स्मित मच्छार यांचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत रंजक आणि तरुणांसाठी मार्गदर्शक ठरण्याजोगा आहे. मूळचे कापड व्यवसायाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेल्या स्मित यांनी १२ वी पूर्ण केल्यानंतर सुरुवातीला टेक्सटाइल इंजिनिअरिंगचा मार्ग निवडला होता. त्यानंतर त्यांनी मॅनेजमेंटच्या शिक्षणाकडे पाऊल टाकले. मात्र, वयाच्या १९ व्या वर्षी एका एव्हिएशन सेमिनारला उपस्थित राहिल्यानंतर त्यांच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली. विमानाच्या कॉकपिटमध्ये बसून उड्डाण करण्याचे स्वप्न त्यांच्या मनात रुजले. त्यांच्या वडिलांनी या निर्णयाचे स्वागत करत त्यांना आवश्यक माहिती गोळा करण्यास प्रोत्साहन दिले. त्यानंतर त्यांनी न्यूझीलंड गाठून कठीण परिस्थितीत वैमानिकाचे मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षण पूर्ण केले.
आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी २०११ मध्ये स्पाइसजेट या भारतीय विमान वाहतूक कंपनीतून केली. तेथे त्यांनी फर्स्ट ऑफिसर, सीनियर कमांडर आणि लाइन ट्रेनिंग कॅप्टन यांसारख्या अत्यंत जबाबदारीच्या भूमिका बजावल्या. बोइंग ७३७ मॅक्स विमानांच्या भारतातील पहिल्या तुकडीतील वैमानिकांमध्ये त्यांचा समावेश होता. त्यानंतर जून २०२२ मध्ये ते संयुक्त अरब अमिरातीच्या सरकारी विमान कंपनीत म्हणजेच 'फ्लाई-दुबई'मध्ये थेट 'डायरेक्ट एंट्री कॅप्टन' म्हणून रुजू झाले. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्यांच्या नावावर बोइंग ७३७ विमानाचा १३ वर्षांहून अधिक काळाचा सुरक्षित उड्डाणाचा अनुभव असून, त्यांनी ९,७५० हून अधिक तास यशस्वीपणे उड्डाण केले आहे.
वैमानिक म्हणून सेवा बजावत असताना प्रवाशांशी संवाद साधणे आणि पारदर्शकता ठेवणे ही त्यांची प्रमुख कार्यशैली राहिली आहे. आपल्या सुरुवातीच्या दिवसांतील एका प्रसंगाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले होते की, एकदा तांत्रिक कारणास्तव उड्डाणाला उशीर होत असताना प्रवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. अशा वेळी प्रवाशांना अंधारात न ठेवता थेट कॉकपिटमधून पीए सिस्टीमद्वारे परिस्थितीची खरी माहिती दिल्यास ते अधिक सहकार्य करतात. हाच धडा त्यांनी नंतरच्या संपूर्ण कारकिर्दीत पाळला. गंभीर टर्ब्युलन्स असो वा उड्डाणादरम्यान वैद्यकीय आणीबाणी असो, त्यांनी नेहमीच शून्य त्रुटीच्या तत्त्वावर काम करत प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले.
दुबईवरून तेल अवीवकडे जात असताना घडलेल्या घटनेत त्यांच्या या अनुभवाची आणि धैर्याची खरी परीक्षा लागली. मिळालेल्या माहितीनुसार, उड्डाणादरम्यान एका सह-वैमानिकाने विमान नष्ट करण्याचा घातपाती प्रयत्न केला. या वेळी कॉकपिटमध्ये दोन्ही वैमानिकांमध्ये तीव्र संघर्ष झाला. या संघर्षादरम्यान कॅप्टन स्मित गंभीर जखमी झाले आणि त्यांना चाकूचा वार सहन करावा लागला. शरीर रक्ताने माखलेले असताना आणि असह्य वेदना होत असतानाही त्यांनी नियंत्रण सुटू दिले नाही. स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता, इतर क्रू मेंबर्स आणि प्रवाशांच्या मदतीने त्यांनी सह-वैमानिकाला ताब्यात घेतले आणि विमानाचे सुरक्षित लँडिंग घडवून आणले.
वैमानिक हे केवळ तांत्रिक ज्ञान असलेले अधिकारी नसून ते संकटाच्या वेळी आत्मसमर्पण न करणारे खरे रक्षक असतात, हेच कॅप्टन स्मित माछर यांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. त्यांच्या या अतुलनीय शौर्यामुळे संपूर्ण देशभरातून आणि जागतिक विमान वाहतूक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


