नवी दिल्ली : देशात सणासुदीचा हंगाम सुरू होत असतानाच व्यावसायिक वापराच्या १९ किलो एलपीजी सिलिंडरच्या दरात १ ऑक्टोबरपासून वाढ करण्यात आली आहे. शहरानुसार या दरवाढीत फरक असून, काही ठिकाणी सिलिंडर तब्बल ७१.५० रुपयांनी महागला आहे. मात्र, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ६२.५० रुपयांची वाढ झाली आहे. तो आता २,८१० रुपयांना मिळणार आहे. सप्टेंबरमध्ये या सिलिंडरची किंमत २,७४७.५० रुपये होती.
मुंबईत व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ६३ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे किंमत २,७०१ रुपयांवरून २,७६४ रुपये झाली आहे. चेन्नईमध्ये ६६.५० रुपयांनी वाढ होऊन दर २,९१६.५० रुपयांवरून २,९८३ रुपये झाला आहे. पाटण्यात सर्वाधिक ७१.५० रुपयांची वाढ झाली आहे. सिलिंडरची किंमत ३,०२९ रुपयांवरून ३,१००.५० रुपयांवर पोहोचली आहे. लखनऊमध्येही ६२.५० रुपयांची वाढ होऊन नवा दर २,९३२.५० रुपये झाला आहे.
इतर शहरांमध्येही व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. लेहमध्ये किंमत ३,३८५.५० रुपयांवरून ३,४५० रुपये, तर तवांगमध्ये ३,०७३.५० रुपये झाली आहे. अहमदाबादमध्ये नवा दर २,८३१.५० रुपये, तर कन्याकुमारीमध्ये ३,०४६ रुपये आहे.
घरगुती सिलिंडरच्या दरात बदल नाही
१४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. दिल्लीत तो ९४२ रुपये, मुंबईत ९४१.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ९५७.५० रुपये आहे. लखनऊमध्ये घरगुती सिलिंडरचा दर ९७९.५० रुपये, तर पाटण्यात १,०३१.५० रुपये कायम आहे.
आंतरराष्ट्रीय एलपीजी दरातील चढ-उतार तसेच चलन विनिमय दरातील बदलांचा देशातील एलपीजीच्या किमतींवर परिणाम होतो. या दरवाढीचा परिणाम प्रामुख्याने हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक आस्थापनांवर होणार आहे. घरगुती ग्राहकांना मात्र या दरवाढीचा थेट फटका बसणार नाही.


