पणजी : ‘कोणी पाठलाग करत असल्यास, पतीकडून मारहाण किंवा आत्महत्येचा विचार अशा कठीरण प्रसंगी १८१ क्रमांकावर डायल करा. नऊ मिनिटांत पोलीस घरी पोहोचतील. घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे’; असे अावाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महिलांना केले आहे. मी तुमच्या पाठीशी आहे, याची खात्री बाळगा असे मुख्यमंत्री म्हणाले.
महिलांना कोणत्याही कठीण प्रसंगी तातडीने मदत मिळावी यासाठी १८१ हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. संकटाच्या वेळी महिलांनी घाबरून न जाता या क्रमांकावर संपर्क साधावा, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.कठीण प्रसंगांत, संकटाच्या वेळी महिलांना मदतीचा हात देण्यासाठी खास १८१ क्रमांकाची हेल्पलाईन महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून संबंधित महिलेला आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून दिली जाणार आहे.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, १८१ क्रमांकावर फोन करून माहिती दिल्यानंतर अवघ्या नऊ मिनिटांत पोलीस संबंधित महिलेच्या घरी पोहोचणार, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे संकटाच्या काळात महिलांनी घाबरू नये, मुख्यमंत्री, सरकार तुमच्या पाठीशी असल्याची खात्री बाळगावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केली. खात्री करून घ्यायची असल्यास आताच १८१ क्रमांकावर संपर्क करून पहावे व नंतर खात्री झाल्यास केवळ पडताळणी करण्यासाठी फोन केल्याचे त्यांना सांगावे असे मुख्यमंत्री म्हणाले.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपलब्ध असलेल्या या सुविधेचा अधिकाधिक महिलांनी वापर करून घ्यावा आणि संकटाच्या वेळी तातडीने मदत घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.


