
गोवन वार्ता
पणजी
केंद्रीय नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) गोवा विभागाने थिवी रेल्वे स्थानकावर कारवाई करून म्हापसाचे माजी नगरसेवक फ्रान्सिस्को (फ्रँकी) कार्व्हालो यांचे जावई प्रशील शिंदे (२७) याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने चार दिवसांची एनसीबी कोठडी ठोठावली आहे. त्याच्याकडून चरस, एमडीएमए, तसेच इतर वेगवेगळ्या प्रकारचे आणि परिवर्तनीय प्रमाण रासायनिक ड्रग्ज जप्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्व्हालो यांचे जावई प्रशील शिंदे ड्रग्ज तस्करीत गुंतल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार, एनसीबीच्या गोवा विभागाचे उपसंचालक अंकुश सलामे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक विशाल पवार व इतरांच्या पथकाने म्हापसाचे माजी नगरसेवक फ्रान्सिस्को (फ्रँकी) कार्व्हालो यांच्या घरासह त्याचे जावई प्रशील शिंदे राहत असलेल्या डांगी कॉलनीतील फ्लॅटवर मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी छापा टाकला. त्यावेळी शिंदे याच्या फ्लॅटवरून एनसीबीने चरस, एमडीएमए तसेच इतर वेगवेगळ्या प्रकारचे आणि परिवर्तनीय प्रमाणात रासायनिक ड्रग्ज जप्त केले आहे. दरम्यान, संशयित प्रशील शिंदे त्यांना सापडला नाही.
एनसीबीच्या पथकाने रात्री ११.३० वाजता थिवी रेल्वे स्थानकाच्या परिसरातून प्रशील शिंदे याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. बुधवारी सायंकाळी शिंदे याला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने शिंदे याला चार दिवसांची एनसीबीची कोठडी ठोठावली. याबाबतचा आदेश न्या. पूजा सरदेसाई यांनी दिला.
कार्व्हालो यांच्या घरावरही छापा
याच दरम्यान एनसीबीने माजी नगरसेवक फ्रान्सिस्को (फ्रँकी) कार्व्हालो याच्या घरावर छापा टाकला. तिथे एनसीबीला कोणत्याच प्रकारचे ड्रग्ज सापडले नाही. मात्र कार्व्हालो यांची मुलगी निकिता यांची चौकशी एनसीबीने केली. तसेच पुढील चौकशीसाठी बुधवारी तिला विभागात हजर राहण्यास सांगितले होते. याच दरम्यान
निकिताच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी
फ्रान्सिस्को (फ्रँकी) कार्व्हालो यांची मुलगी निकिता कार्व्हालो हिला एनसीबीच्या विभागात बुधवारी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र तिथे हजर न राहता निकिता हिने मेरशी येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे.


