गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
राज्यात सप्टेंबर महिन्यात ५३२ जणांची डेंग्यू एनएस १ चाचणी पॉझिटिव्ह आली होती. यातील ६६ जणांना डेंग्यूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उत्तर गोव्यात १०४ जणांची चाचणी करण्यात आली. त्यातील ३ जणांना डेंग्यूची बाधा झाली होती. दक्षिण गोव्यात ४२८ पैकी ६३ जणांना डेंग्यूची बाधा झाल्याचे आढळले होते. आरोग्य खात्यातर्फे एनएस १ चाचणी केलेल्या सर्व रुग्णांवर डेंग्यूसाठीचे उपचार केले जातात. सप्टेंबरमध्ये सततच्या ऊन-पावसामुळे डासांची पैदास अधिक झाली.
ऑगस्ट, सप्टेंबर, मे महिन्यात डेंग्यूचे रुग्ण तुलनेने अधिक प्रमाणात आढळतात. मेमध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे पाणी चुकीच्या पद्धतीने साठवून ठेवले जाते. अशावेळी पाण्यात डासांची उत्पत्ती होते. सप्टेंबरमध्ये पावसासह ऊन असते. यामुळे डासांच्या उत्पत्तीत वाढ होते. ऑगस्टमध्ये ८८६ जणांची डेंग्यू एनएस १ चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यातील ४९ जणांना डेंग्यूची बाधा झाली होती. यातील ७ जणांना बाधा झाल्याचे आढळले होते.
डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी खात्यातर्फे केल्या जाणाऱ्या उपाययोजनात वाढ करण्यात आली आहे. नागरिकांनी घराची, परिसराची स्वच्छता राखणे आवश्यक आहे. कुंड्या, फ्रीज किंवा अन्य ठिकाणी साचून राहिलेले पाणी सहा दिवसांतून एकदा साफ करणे आवश्यक आहे, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 


