गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
शिक्षण संचालक शैलेश झिंगडे निवृत्त झाल्यामुळे शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांच्याकडे शिक्षण संचालकपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. याविषयीचा आदेश सरकारने जारी केला आहे.
शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांच्याकडे शिक्षण संचालकपदाचा ताबा राहील. भगीरथ शेट्ये यांनी ग्रेड वन शिक्षक, साहाय्यक शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक, शालान्त मंडळाचे सचिव अशा विविध पदांच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. आता शालान्त मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांच्याकडे शिक्षण संचालकपदाचा अतिरिक्त ताबाही देण्यात आला आहे.
भौतिकशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर १९९० साली ते ग्रेड वन शिक्षक म्हणून शिक्षण खात्याच्या सेवेत दाखल झाले. २००१ साली हरमल पंचक्रोशी संस्थेत प्राचार्य म्हणून रूजू झाले. त्यानंतर गोवा लोकसेवा आयोगामार्फत साहाय्यक शिक्षण संचालक म्हणून त्यांची निवड झाली. त्यानंतर शालान्त मंडळाचे सचिव, शिक्षण उपसंचालक या पदांवर त्यांची नियुक्ती झाली. शालान्त मंडळाचे अध्यक्ष असतानाच त्यांच्याकडे आता शिक्षण संचालकपदाचा ताबो देण्यात आला आहे.
संयुक्त लेखा संचालकांना मुदतवाढ
दरम्यान, लेखा संचालनालयाचे संयुक्त संचालक गजानन नाईक यांना एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. ३० सप्टेंबर २०२७ पर्यंत ते सेवेत कायम राहणार आहेत. या विषयीचा आदेश जारी झाला आहे.


