दुर्भाट-रासई फेरी धक्क्यावर गॅस टँकर दुर्घटना टळली; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, चौकशीचे आदेश

दक्षिण गोव्यातील दुर्भाट-रासई फेरी मार्गावर जुन्या फेरीबोटीवर गॅस टँकर चढवताना बोट सरकल्याने अपघात होता-होता टळला. या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेत नदी परिवहन खात्याने फेरीच्या कप्तानाविरुद्ध चौकशी व कारवाईचे आदेश दिले आहेत.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
48 mins ago
दुर्भाट-रासई फेरी धक्क्यावर गॅस टँकर दुर्घटना टळली; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, चौकशीचे आदेश

पणजी : दक्षिण गोव्यातील दुर्भाट ते रसाई दरम्यान चालणाऱ्या फेरी धक्क्यावर बुधवारी दुपारी एक मोठा अपघात थोडक्यात टळला. 'मुरगाव' या जुन्या फेरी बोटीवर 'एचपी' कंपनीचा गॅस टँकर चढवत असताना ही अत्यंत धोकादायक घटना घडली. टँकर बोटीवर प्रवेश करत असतानाच अचानक फेरी बोट मागे सरकल्याने टँकरचे नियंत्रण सुटून अपघाताची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, टँकर चालकाचे कौशल्य आणि उपस्थितांच्या प्रसंगावधानामुळे टँकर सुरक्षितपणे मागे घेण्यात आल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

या घटनेने जलवाहतुकीतील प्रवासी व वाहनांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. नदी परिवहन खात्याचे (RND) संचालक विक्रम सिंह भोसले यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. जुन्या आणि जर्जर बोटीवर ज्वलनशील पदार्थांचा टँकर चढवणे अत्यंत धोक्याचे होते. बोटीचे वय व तिची क्षमता लक्षात घेता कप्तानाने टँकरला प्रवेश नाकारायला हवा होता, असे मत त्यांनी व्यक्त केले. या दुर्घटनेची आरएनडीमार्फत सखोल चौकशी केली जाणार असून, कप्तानाचा निष्काळजीपणा सिद्ध झाल्यास त्याच्यावर कडक प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन संचालकांनी दिले आहे.

हेही वाचा
सर्व पहा
महत्वाच्या बातम्या
सर्व पहा