मडगाव : सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, 'ग्रँड अलायन्स' व्हावी आणि भाजपला सत्तेबाहेर ठेवावे, ही लोकांची इच्छा आहे. मात्र, एकमेकांना समजून घेऊन लोकांच्या मतांचा मान राखणे हे आमचे काम आहे आणि ती प्रक्रिया अद्यापही सुरू आहे, असे मत 'गोवा फॉरवर्ड'चे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले.
फातोर्डा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार सरदेसाई यांनी, लोकांच्या इच्छेनुसार राजकीय भूमिका घेणे हे राजकारण्यांचे कर्तव्य आहे, असे स्पष्ट केले.
हिंदू धर्मातील प्रथेप्रमाणे पितृपक्षात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात केली जात नाही. त्यामुळे या महिनाभराच्या कालावधीत मोठ्या राजकीय हालचाली केल्या जात नाहीत आणि कोणतीही चूक होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. निवडणुका अजून दूर आहेत आणि 'आम आदमी पक्षा'सोबत युती आधीच जाहीर झालेली आहे. ही युती कायम असून त्याचा प्लॅटफॉर्मही सर्वांसाठी खुला आहे. यामध्ये नव्या लोकांनाही सोबत घेतले जाऊ शकते. लोकांना एक चांगला आणि भक्कम पर्याय देण्यासाठी जे काही करावे लागेल, ते करण्याची आमची तयारी आहे. युतीचा निर्णय हा सर्वांच्या सहमतीनेच घेतला जातो. गोव्याच्या जनतेला काय हवे आहे, हे समजून-जाणून घेऊन काम करणे हे आमचे कर्तव्य आहे. एकाला युती हवी तर दुसऱ्याला नको, अशा विविध मतप्रवाहांमधून जाताना योग्य मार्ग काढून पुढे जाणे हेच राजकारण्यांचे काम आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले.
दरम्यान, फातोर्डा येथे 'पीपल्स पाथ'ची निर्मिती करण्यात येत असून त्या कामाची पाहणी करण्यासाठी आपण रात्रीच्या वेळी गेलो होतो. त्याच वेळी काँग्रेस आमदार कार्लुस फेरेरा हे त्या मार्गावरून जात होते. आमदार फेरेरा हे फातोर्डाचेच नागरिक असून त्यांचे जुने घर याच परिसरात आहे. फातोर्डा परिसरात 'कोकोनट एव्हेन्यू'चे काय काम चालले आहे हे जाणून घेण्यासाठी ते थांबले होते. त्याच वेळी पत्रकार तेथे आले आणि त्यांनी विचारणा केली असता, "या कामात गोव्याचा इतिहास, वारसा आणि 'गोयकारपणा'ची झलक दिसत असल्याने आपण ते पाहण्यासाठी थांबलो," असे फेरेरा यांनी सांगितले. त्यामुळे आमदार कार्लुस फेरेरा यांच्याशी झालेल्या या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असे आमदार सरदेसाई यांनी स्पष्ट केले.


