रात्री उशिरापर्यंत मोबाइल वापरता ? फोनच्या कृत्रिम प्रकाशाचा होतो हृदयावर परिणाम; नव्या संशोधनातून समोर आली माहिती

रात्रीच्या वेळी बेडरूममधील प्रकाश आणि वाढलेल्या स्क्रीनटाइममुळे हृदयाच्या कार्यपद्धतीवर परिणाम होत असल्याचे युरोपियन हार्ट जर्नलच्या अभ्यासात समोर आले असून, आशियातील आणि विशेषकरून भारतीयांनी योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
रात्री उशिरापर्यंत मोबाइल वापरता ? फोनच्या कृत्रिम प्रकाशाचा होतो हृदयावर परिणाम; नव्या संशोधनातून समोर आली माहिती

आधुनिक जीवनशैलीत रात्रीच्या वेळी काम, मनोरंजन किंवा इतर कारणाने मोबाइल स्क्रीनटाइम गेल्या १० वर्षांत तब्बल ६७ टक्के  वाढला आहे. मात्र, रात्रीच्या वेळी जास्त कृत्रिम प्रकाशाच्या संपर्कात राहणे हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते, असा इशारा एका नव्या संशोधनातून देण्यात आला आहे. 'युरोपियन हार्ट जर्नल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात युके बायोबँकमधील सुमारे ११ हजार सहभागींच्या सात दिवसांच्या प्रकाशाच्या नोंदी आणि त्यानंतर तीन वर्षांनी करण्यात आलेल्या कार्डियाक एमआरआय अहवालांचे सखोल विश्लेषण करण्यात आले.


A Funny Sleepless Man Clipart Using Phone in Bed - Cartoon Insomnia and  Screen Addiction 66737657 Vector Art at Vecteezyज्या व्यक्ती रात्रीच्या वेळी अधिक प्रकाशाच्या संपर्कात होत्या, त्यांच्या हृदयाच्या रचनेत आणि कार्यपद्धतीत काही विशिष्ट बदल आढळून आले आहेत. हा अभ्यास निरीक्षणात्मक स्वरूपाचा असल्याने रात्रीचा प्रकाश हा थेट हृदयविकाराचे कारण आहे असे सिद्ध होत नसले तरी, प्रकाश प्रदूषण आणि हृदयाचे आरोग्य यांचा जवळचा संबंध असल्याचे यातून स्पष्ट होते.


Heart Attack Treatment Can Cost Rs 8-10 Lakh: How Much Can Your Health  Insurance Cover?


भारतीयांमध्ये हृदयविकाराचा वाढता धोका आणि कारणे

भारताच्या संदर्भात हा संशोधन अहवाल अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या देशात हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांमुळे दरवर्षी सुमारे ३० लाख नागरिकांचा मृत्यू होतो, जे एकूण मृत्यूंच्या जवळपास २८ टक्के आहे. चिंतेची बाब म्हणजे कॉकेशियन किंवा पाश्चात्य लोकांच्या तुलनेत भारतीयांना साधारण १० वर्षे आधीच हृदयविकाराचा झटका येत असल्याचे आकडेवारी सांगते. यामागे केवळ आनुवंशिकता आणि बिघडलेली जीवनशैलीच कारणीभूत नसून अपुरी झोप, वायू प्रदूषण आणि आता वेगाने वाढणारे रात्रीचे 'प्रकाश प्रदूषण' हेदेखील महत्त्वाचे घटक ठरत आहेत. त्यामुळे झोपताना बेडरूममध्ये शक्य तितका अंधार ठेवणे आणि झोपण्यापूर्वी मोबाईल, लॅपटॉप अथवा टीव्हीचा वापर टाळणे हे साधे बदल आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे बनले आहेत.


8 Major Heart Attack Causes in India | Best Cardiology in Delhi


आपत्कालीन परिस्थिती आणि मुंबईतील धक्कादायक वास्तव

हृदयविकाराचा झटका आल्यास पहिल्या काही मिनिटांत मिळणारे प्रथमोपचार रुग्णाचा जीव वाचवू शकतात. परंतु, याबाबत सामान्य नागरिकांमध्ये जागरूकतेचा मोठा अभाव असल्याचे दिसून आले आहे. मुंबईतील मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलने १,५०० नागरिकांवर केलेल्या सर्वेक्षणात सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन) आणि एइडी (ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर) या उपकरणाबाबत अनेक गैरसमज उघड झाले आहेत. सर्वेक्षणातील तब्बल ७५ टक्के नागरिकांना एइडी उपकरणाचा वापर केवळ डॉक्टरच करू शकतात असा चुकीचा समज होता. तर ६८ टक्के लोकांना आपल्या आसपास सार्वजनिक ठिकाणी एइडी उपकरण कुठे उपलब्ध आहे याची साधी माहितीही नव्हती. याशिवाय ४६ टक्के नागरिकांनी आत्मविश्वासाच्या अभावामुळे आपत्कालीन स्थितीत मदत करण्यास असमर्थता दर्शवली.


Heart Attack in Younger Age: How to Avoid


कायदेशीर संरक्षण आणि सामाजिक जागरूकतेची गरज

प्रशिक्षित व्यक्तींमध्येही कायदेशीर अडचणी किंवा सुरक्षेच्या भीतीपोटी मदत न करण्याची प्रवृत्ती दिसून आली आहे. सर्वेक्षणात सहभागी ३६ टक्के प्रशिक्षित लोकांनी मदतीशिवाय एकट्याने सीपीआर देणे कठीण असल्याचे सांगितले, तर ३२ टक्के लोकांना सीपीआर देण्यासाठी वैद्यकीय परवान्याची गरज असते असा भ्रम होता. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, ३२ टक्के नागरिकांना 'गुड समेरिटन' अर्थात आपत्कालीन परिस्थितीत मदत करणाऱ्या नागरिकांना मिळणाऱ्या कायदेशीर संरक्षणाची अजिबात माहिती नव्हती. केंद्र सरकारच्या गुड समेरिटन कायद्यानुसार, अत्यंत सद्भावनेने आणि प्रामाणिकपणे एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी मदत करणाऱ्या नागरिकाला कोणत्याही पोलिसांच्या किंवा कोर्टाच्या कटकटीपासून पूर्ण संरक्षण दिलेले आहे. त्यामुळे अशा आपत्कालीन स्थितीत भीती न बाळगता नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे.


Heart Attack Insurance Guide – HDFC Life


आरोग्यदायी सवयी आणि प्रतिबंधात्मक उपाय

एकंदरीत, हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी दैनंदिन आयुष्यात काही छोटे पण प्रभावी बदल करणे आवश्यक आहे. रात्री झोपण्याच्या वेळी खोलीत पूर्ण अंधार ठेवावा आणि अनावश्यक दिवे बंद ठेवावेत. झोपण्यापूर्वी किमान अर्धा ते एक तास आधी सर्व प्रकारच्या डिजिटल स्क्रीनपासून दूर राहावे, जेणेकरून शरीराचे नैसर्गिक जैविक घड्याळ (सर्कॅडियन रिदम) सुरळीत राहील. त्याचप्रमाणे प्रत्येक नागरकाने सीपीआर आणि एइडीच्या वापराचे योग्य प्रशिक्षण घेणे काळाची गरज बनली आहे. दैनंदिन सवयींमधील सुधारणा आणि आपत्कालीन सज्जता या दोन्ही गोष्टींची योग्य सांगड घातल्यास हृदयविकारापासून होणारे संभाव्य धोके नक्कीच टाळता येणे शक्य आहे.

Heart Attack: Understanding the Symptoms and Risk Factors – MyDiagnostics

हेही वाचा
सर्व पहा