'कदंब'चे स्टेअरिंग पहिल्यांदाच महिलेच्या हाती! डिचोलीच्या पूजा वायंगणकरची १०० चालकांमधून निवड

डिचोली येथील पूजा वायंगणकर यांची कदंब परिवहन महामंडळात चालक म्हणून निवड झाली असून, त्या गोव्यातील 'कदंब' बस चालवणाऱ्या पहिल्या महिला चालक ठरल्या आहेत.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
'कदंब'चे स्टेअरिंग पहिल्यांदाच महिलेच्या हाती! डिचोलीच्या पूजा वायंगणकरची १०० चालकांमधून निवड

पणजी : गोव्यातील सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक बदल घडताना दिसत आहे. 'कदंब परिवहन महामंडळाच्या' (KTCL) बसचे स्टेअरिंग आता पहिल्यांदाच एका महिलेच्या हाती आले आहे. डिचोली येथील रहिवासी असलेल्या पूजा वायंगणकर यांची रितसर मुलाखत आणि ड्रायव्हिंग कौशल्याच्या परीक्षेनंतर चालक म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रशासकीय प्रक्रिया आणि आवश्यक सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर त्या लवकरच प्रत्यक्ष चालक म्हणून आपला पदभार स्वीकारतील. त्यांच्या या निवडीमुळे सार्वजनिक वाहतुकीच्या पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या क्षेत्रात महिलांच्या सक्षम सहभागाचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे.

 कौशल्याच्या जोरावर यश

'गोवन वार्ता'च्या प्रतिनिधीशी बोलताना कदंब परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रोहन कासकर यांनी या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. महामंडळाने १०० चालकांच्या भरतीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीला प्रतिसाद देत मुलाखतीसाठी आलेल्या १०० उमेदवारांमध्ये पूजा वायंगणकर या एकमेव महिला होत्या. त्यांनी दिलेली मुलाखत आणि बस चालवण्याचे प्रत्यक्ष कौशल्य लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली. पूजा यांना वाहन चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी अवजड वाहने चालवताना ट्रकमधून बेळगावपर्यंत प्रवास केला आहे. त्यांचा हा अनुभव आणि आत्मविश्वास कदंब महामंडळातील प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

प्रवासी सेवेतील महिलांचा वाढता सहभाग

कदंब महामंडळात केवळ चालकच नव्हे, तर इतर पदांवरही महिलांचा सहभाग सातत्याने वाढत आहे. याआधी कंडक्टर (वाहक) पदाच्या २५० जागांसाठी झालेल्या भरतीत ५० ते ६० महिला उमेदवारांची निवड झाली होती, ज्या सध्या उत्तम सेवा देत आहेत. याशिवाय तिकीट तपासनीस (टीसी) म्हणूनही १० महिला कर्मचारी कार्यरत आहेत. महिला प्रवाशांची सुरक्षितता आणि महिला कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन या दृष्टीने हा बदल अत्यंत सकारात्मक मानला जात आहे. पूजा वायंगणकर यांची ही निवड गोव्यातील तरुण महिलांसाठी प्रेरणादायी ठरणार असून, पारंपरिक चौकटी मोडून नव्या क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी मार्गदर्शक ठरेल.


हेही वाचा
सर्व पहा